Join us  

अखेर स्मृती मंधानाने तो विक्रम केलाच... 

भारताच्या स्मृती मंधानाने महिलांच्या क्रिकेट सुपर टी-20 लीगमध्ये जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अखेर नावावर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 9:07 PM

Open in App

लंडन - भारताच्या स्मृती मंधानाने महिलांच्या क्रिकेट सुपर टी-20 लीगमध्ये जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अखेर नावावर केला. वेस्टर्न स्टॉर्म क्लबचे प्रतिनिधीत्व करणा-या मंधानाने अवघ्या 18 चेंडूंत 50 धावा कुटल्या. या लीगमधील जलद अर्धशतकाचा विक्रम मंधानाच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला टी-20 लीगमध्ये न्यूझीलंडच्या सोफी डेव्हीन हीच्या नावावर असलेल्या विक्रमाशीही तिने बरोबरी केली आहे.  इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून आयोजित करण्यात येणा-या लीगमध्ये खेळणारी स्मृती ही पहिली भारतीय खेळाडू आहे. याआधी हरमनप्रीत कौरला सरे स्टर्स संघाने करारबद्ध केले होते, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे तिला एकही सामना खेळता आला नव्हता. मंधानाने रविवारी झालेल्या लढतीत लाँगबोरोध लाईटनिंग क्लबच्या गोलंदाजांची धुलाई करताना 5 चौकार आणि 4 षटकार खेचून 19 चेंडूंत नाबाद 52 धावा केल्या. तिने षटकार खेचून हा विक्रम केला. इंग्लंडमधील या लीगच्या पहिल्याच लढतीत ती या विक्रमाच्या जवळपास पोहोचली होती. यॉर्कशर डायमंड क्लबविरूद्ध तिने 20 चेंडूंत 48 धावा केल्या होत्या. त्यात तिने 5 षटकार आणि 3 चौकार लगावले होते. मार्च महिन्यात मंधानाने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात 25 चेंडूंत 50 धावा करतानाच स्वतःचाच 30 चेंडूतील 50 धावांचा विक्रम मोडला होता. मंधानाच्या आजच्या खेळीने वेस्टर्न स्टॉर्म क्लबने 18 धावांनी विजय मिळवला. 

टॅग्स :भारतक्रिकेटबीसीसीआय