पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकर जैनब अब्बास ही वर्ल्डकप स्पर्धा अर्ध्यावर सोडून पाकिस्तानमध्ये परतल्याने वादाला तोंड फुटले होते. तिच्या भारत सोडून जाण्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आता खुद्द जैनब हिनेच याबाबतचं नेमकं कारणं सांगितलं आहे. आयसीसीच्या डिजिटल टिमसाठी भारतामध्ये विश्वचषक स्पर्धा कव्हर करण्यासाठी जैनब ही भारतात आली होती. तिने भूतकाळामध्ये सोशल मीडियावर भारताविरोधात केलेल्या कथित पोस्टवरून वाद झाल्याने तिने भारत सोडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आयसीसीने हा दावा फेटाळून लावताना जैनब हिने व्यक्तिगत कारणांमुळे भारत सोडल्याचे सांगितले होते.
आता जैनब अब्बास हिने मौन सोडताना सोशल मीडियावरूव याबाबतचं नेमकं कारण सांगितलं आहे. ट्विटरवर याबबत एक विस्तृत पोस्ट शेअर करताना तिनं सांगितलं की, मी माझ्या आवड्या खेळाशी संबंधित संधींसाठी स्वत:ला भाग्यशाली समजले आहे. ही माझ्यासाठी मोठी संधी असते. मला ना भारतातून जाण्यास सांगण्यात आलं, ना मला तिथून निर्वासित करण्यात आलं, असं जैनब हिने स्पष्ट केलं आहे.
ती पुढे म्हणाली की, भारतात माझ्या सुरक्षेला कुठलाही धोका नव्हता. मात्र माझे कुटुंबीय आणि दोन्ही देशांमधील माझी मित्रमंडळी चिंतीत होती. जे काही घडले होते, त्यावर विचार करण्यासाठी मला काही स्थान आणि वेळेची आवश्यकता होती. मी प्रसारित केलेल्या पोस्टमधून दुखावलेल्या भावना समजू शकते. त्यासाठी मी खेद व्यक्त करते. अशा भाषेसाठी कुठलीही सबब देता येऊ शकत नाही. यामुळे जे कुणी दुखावले आहेत, त्यांची मी प्रामाणिकपणे माफी मागते.
३५ वर्षीय जैनब अब्बास ही ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेल्या सामन्यावेळी हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये उपस्थित होती. भारतात होत असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं वार्तांकन करणार असल्याचं तिने सोशल मीडियावरून जाहीर केलं होतं. मात्र त्याचवेळी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील काही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. तिच्या पोस्टमधून हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचे समोर आले होते.