अॅडलेड : गेल्या काही सामन्यांतील संथ खेळी आणि लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात येत असलेल्या अपयशामुळे क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम ‘फिनिशर’ म्हणून गणल्या गेलेल्या महेंद्रसिंग धोनीवर टीकेची झोड उठत होती. मात्र, मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहत शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताच्या विजयावर शिक्का मारला. धोनीचे निर्णायक नाबाद अर्धशतक आणि कर्णधार विराट कोहलीने झळकावलेले ३९वे शतक या जोरावर भारताने यजमान आॅस्टेÑलियाचा ६ गड्यांनी पराभव करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने दिलेले २९९ धावांचे आव्हान भारताने ४९.२ षटकात केवळ ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
विराट कोहलीची आवडत्या मैदानावरील शतकी खेळी तसेच महेंद्रसिंग धोनीने ‘फिनिशर’च्या भूमिकेला दिलेल्या न्यायपूर्ण कामगिरीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाचा नमविले. ऑस्ट्रेलियाच्या ५० षटकांतील ९ बाद २९८ धावांचा पाठलाग करणाºया भारताने सर्वोत्कृष्ट दोन फलंदाजांच्या धडाक्याच्या बळावर विजयी लक्ष्य सोपे केले. कोहलीने ११२ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह १०४ धावा ठोकल्या. मागच्या सामन्यात संथ फलंदाजीमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या धोनीने ५४ चेंडूत नाबाद ५५ धावा कुटल्या.
भारताच्या विजयात भुवनेश्वर कुमार (५४ धावांत ४), मोहम्मद शमी (५८ धावांत ३) यांची मोलाची भूमिका राहिली. या दोघांनी अखेरच्या चार षटकात धावांवर अंकुश लावला. शिवाय शॉन मार्श आणि मॅक्सवेल यांना बादही केले. मार्शने १२३ चेंडूत ११ चौकार व ३ षटकारांसह १३१ धावा ठोकल्या. तसेच, मॅक्सवेलने ३७ चेंडूत ४८ धावा कुटताना ५ चौकार व एक षटकार मारला.
यानंतर धावांचा पाठलाग करताना कोहलीने अॅडलेडवर पाचवे शतक ठोकले. त्याआधी सलामीचा शिखर धवन याने २८ चेंडूत ३२ धावा केल्या. रोहित शर्मानेही ५२ चेंडूत ४३ धावा ठोकून धावसंख्येला आकार दिला. अंबाती रायुडू २४ धावा काढून बाद झाला.कोहलीने बेहरेनडोर्फ व लियोन यांना षटकार खेचून १०८ चेंडूत ३९वे एकदिवसीय आणि ६४वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.
आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत विराट सचिन (१००) व रिकी पाँटिंग (७१) यांच्यानंतर तिसºया स्थानी आहे. तो बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी ३८ चेंडूत ५७ धावांची गरज होती. यावेळी, धोनीने दिनेश कार्तिकसह (१४ चेंडूत नाबाद २५) फिनिशरची भूमिका स्वीकारली. त्याने विजयी धाव घेत स्वत:चे ६९ वे एकदिवसीय अर्धशतकही साजरे केले.
तत्पूर्वी आॅसीकडून सलामीवीर अॅरोन फिंच (६) व अॅलेक्स केरी(१८) हे झटपट बाद झाले. मार्शला उस्मान ख्वाजाने (२१) साथ दिली पण तो १९ व्या षटकात धावबाद झाला. मार्शने मात्र मोहम्मद सिराजच्या षटकांमध्ये भरपूर धावा वसूल केल्या.‘फिनिशर’बनावे ही संघ व्यवस्थापनाची इच्छा - दिनेश कार्तिक‘संघ व्यवस्थापनाने माझ्यावर सहाव्या स्थानी खेळून ‘मॅच फिनिशर’ बनण्याची जबाबादारी टाकली आहे,’ असे भारताचा फलंदाज दिनेश कार्तिक याने मंगळवारी सांगितले. आॅस्टेÑलियाविरुद्धच्या विजयानंतर बोलताना कार्तिकने महेंद्रसिंग धोनीचेही कौतुक केले. ‘धोनी गरजेनुसार अद्यापही प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यास सक्षम आहे,’ असे त्याने सांगितले.
कार्तिक म्हणाला, ‘माझ्यामते धोनीने या मालिकेत शानदार फलंदाजी केली. तो अशी कामगिरी यापूर्वी अनेकदा करीत आला आहे. धोनीला फलंदाजी करताना आणि फिनिशर बनताना पाहणे शानदार असते. आधी तो दडपणात स्वत:ला झोकून देतो आणि नंतर प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणतो. त्याचे हेच तर वैशिष्ट्य आहे. आज त्याची झलक पहायला मिळाली.’कार्तिकने फिनिशरच्या स्वत:च्या भूमिकेबाबत विचारातच सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला,‘मी यावर अभ्यास करीत आहे. फिनिशर बनण्यासाठी कौशल्याची गरज आहे. अनुभव असेल तर कौशल्य येते. सामना संपवून विजेता बनणे शानदार असते. संघ व्यवस्थापनाने मला माझ्या भूमिकेबाबत सांगितले आहे. मी सहाव्या स्थानावर फलंदाजी करावी यासाठी व्यवस्थापनाचा पाठिंबा लाभला आहे.’