साउथम्पटन : भारताच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या आक्रमणापुढे इंग्लिश फलंदाज अडखळले. इंग्लंडची आघाडीची फळी ६९ धावातच तंबूत परतली. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्या माऱ्यापुढे इंग्लंडची दैना झाली. मात्र त्यानंतर मोईन अली (नाबाद ४०) आणि सॅम कुरन (नाबाद ३०) यांनी केलेल्या खेळीमुळे इंग्लंडने ५६ षटकांत १५२ धावा केल्या.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाच्या चांगलाच अंगलट अला. तिसºया षटकात जसप्रीत बुमराह याने सलामीवीर केटॉन जेनिंग्जला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. जेनिंग्जला भोपळाही फोडता आला नाही.त्यानंतर इशांत शर्माने कर्णधार जो रुटला पायचीत केले. त्यावेळी इंग्लंडची अवस्था २ बाद १५ अशी होती. काही वेळातच पहिल्या दोन कसोटी चांगली खेळी करणाºया जॉनी बेअरस्टोला बुमराहने पंतकरवी झेलबाद केले आणि इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले. हार्दिक पांड्याने अनुभवी कूकला बाद करत इंग्लंडची अवस्था चार बाद ३६ धावा अशी केली. मात्र त्यानंतर बेन स्टोंक्स आणि बटलर यांनी डाव सांभाळला. उपहारापर्यंत इंग्लंड संघाची ४ बाद ५७ अशी धावसंख्या होती. दोघांची भागिदारी धोकादायक ठरत असतानाच शमीने आधी बटलर आणि नंतर स्टोंक्सला बाद केले.
भारतीय संघ आपला फास आवळणार असे दिसत असतानाच मोईन अली आणि सॅम कुरन या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंनी नाबाद ६६ धावांची भागिदारी करत इंग्लंडला ५६ व्या षटकापर्यंत दीडशेचा पल्ला गाठून दिला. या दोघांमुळे इंग्लंडला आपली पडझड रोखता आली.जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत या दोघांना चांगली साथ दिली. बुमराह, शमी आणि इशांत यांनी सुरुवातीला अचूक व नियंत्रित मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. यामुळे आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर मधली फळीही दबावाखाली आली. मात्र, मोइन अली व सॅम कुरन यांनी संघाला सावरण्यात मोलाचे योगदान दिले.
धावफलक :इंग्लंड (पहिला डाव) : ५६ षटकांत ६ बाद १५२ धावा, अलेस्टर कूक झे.कोहली गो पांड्या १७, के.के. जेनिंग्ज पायचीत बुमराह ०, जो रुट पायचीत शर्मा ४, जॉनी बेअरस्टो झे. पंत गो. बुमराह ६, बेन स्टोंक्स पायचीत गो. मोहम्मद शमी २१, जोस बटलर झे. कोहली गो. मोहम्मद शमी २१, मोईन अली खेळत आहे ४९, सॅम कुरन खेळत आहे ३०. गोलंदाजी : जसप्रीत बुमराह १५-३-३५-२, इशांत शर्मा ११-६-११-१, हार्दिक पांड्या ६-०-३७-१, मोहम्मद शमी १५-१-४३-२, आर. अश्विन ९-२-१७-०