कटक : कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिका जिंकणारा भारतीय संघ बुधवारपासून प्रारंभ होणाºया टी-२० मालिकेत श्रीलंकेवर वर्चस्व कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने यजमान संघाला बेंच स्ट्रेंथची चाचणी घेण्याची संधी मिळाली आहे.
कसोटी मालिका जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताने वन-डे मालिका २-१ ने जिंकली. आता रोहित शर्मा अॅन्ड कंपनी टी-२० मध्येही याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहे.
धरमशाला येथील पहिल्या वन-डेचा अपवाद वगळता श्रीलंका संघाला या दौºयावर छाप सोडता आलेली नाही. भारताने मोहालीमध्ये मालिकेत पुनरागमन केले आणि विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेने मालिका विजयाची संधी गमावली. एकवेळ १ बाद १३६ अशी दमदार स्थिती असलेल्या श्रीलंकेचा डाव २१५ धावांत संपुष्टात आला. महेंद्रसिंग धोनीने शानदार यष्टिचितचा बळी घेतल्यानंतर फिरकीपटू कुलदीप यादव यजुवेंद्र चहल यांनी श्रीलंकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दोघांनी प्रत्येकी ३ बळी घेत भारताचा विजय निश्चित केला.
टी-२० क्रिकेटमध्ये एकदम वेगळे आहे. भारताने या मैदानावर खेळलेल्या एकमेव टी-२० सामन्याबाबत विशेष चांगल्या आठवणी नाहीत. बाराबती स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताची कामगिरी ७-४ अशी आहे. गेल्या चार लढतींमध्ये भारताने येथे विजय मिळवला आहे. येथे २०१५ मध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० सामन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९२ धावांत बाद झाला होता. त्यानंतर प्रेक्षकांनी गोंधळ घातल्यामुळे मैदान ‘बॅड बुक’मध्ये आले होते.
भारतीय फलंदाजीची दारोमदार कर्णधार रोहित शर्मावर राहील. त्याच्या साथीला के.एल. राहुल असेल. वन-डे मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर रोहितच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने मोहालीमध्ये १४१ धावांनी विजय मिळवला होता. रोहित टी-२० मध्येही हाच फॉर्म कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. मधल्या व तळाच्या फळीवरील दडपण कमी करण्यासाठी भारताला चांगल्या सुरु वातीची गरज आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळणाºया जयदेव उनाडकटचे संघात पुनरागमन झाले आहे तर बासील थम्पी, वॉशिंगटन सुंदर व दीपक हुड्डा प्रथमच खेळणार आहेत.
बडोद्याचा अष्टपैलू हुड्डाने फेब्रुवारीमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजातर्फे चौथे सर्वात वेगवान शतक झळकावले होते. भारतीय संघात धोनी व हार्दिक पांड्या यांच्यासारखे फिनिशर आहेत. त्यामुळे हुड्डाला संधी मिळते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे.
वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहवर जबाबदारी राहील; कारण भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे. केरळचा वेगवान गोलंदाज थम्पीने आयपीएलमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. फिरकीची जबाबदारी चहल व यादव यांच्यावर राहील.
दुसºया बाजूचा विचार करता, सलग पाच टी-२० सामने गमावणाºया श्रीलंका संघासाठी उपुल थरंगाचा चांगला फॉर्म दिलासा देणारी बाब आहे. फलंदाजीची दारोमदार थरंगा व अँजेलो मॅथ्यूज यांच्यावर राहील. मधल्या फळीत निरोशन डिकवेलाकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी धरमशाला वन-डेमध्ये भारताला ११२ धावांत गुंडाळले होते. पण त्यानंतर मात्र त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ-
भारत :- रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, एम.एस. धोनी, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुड्डा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासील थम्पी, जयदेव उनाडकट.
श्रीलंका :- तिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशाल परेरा, धनुष्का गुणतिलका, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका, चतुरंगा डिसिल्व्हा, सचित पतिराना, धनंजय डिसिल्व्हा, नुवान प्रदीप, विश्वा फर्नांडो, दुष्मंता चामीरा.
सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजतापासून.
Web Title: In the first match against Sri Lanka today: now in the T20 T20 series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.