नवी दिल्ली: मी अद्याप कोणताही वारसा मागे सोडलेला नाही, असं म्हणत चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं निवृत्ती स्वीकारण्याचा कोणताही मानस नसल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं. त्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्सकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आयपीएलमध्ये धोनी खेळणार आणि तो चेन्नईकडूनच मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. धोनीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
आयपीएलच्या पुढील पर्वाला सुरुवात होण्याआधी खेळाडूंचा लिलाव होईल. त्यामुळे बऱ्याचशा संघांमध्ये मोठे बदल होतील. या लिलावात चेन्नईची रणनीती काय असेल, याचे संकेत व्यवस्थापनानं दिले आहेत. 'लिलाव प्रक्रियेत काही खेळाडूंना कायम ठेवता येईल. किती खेळाडूंना संघात कायम ठेवता येईल याची आम्हाला कल्पना नाही. पण धोनीच्या बाबतीत हा प्रश्न निर्माणच होत नाही. कारण आम्ही सर्वात आधी त्यालाच रिटेन करू. चेन्नईचा संघ नियमानुसार खेळाडूंना कायम ठेवेल आणि यात धोनीला आमची पहिली पसंती आहे. पहिलं रिटेंशन कार्ड आम्ही धोनीसाठीच वापरू,' असं सीएसकेच्या अधिकाऱ्यानं एएनआयला सांगितलं. आमच्या बोटीला कॅप्टन हवा आहे आणि तो पुढील वर्षी नक्की आमच्याच सोबत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चेन्नईला जेतेपद मिळवून दिल्यानंतर काय म्हणाला होता धोनी?चेन्नईला आयपीएलचं चौथं जेतेपद मिळवून दिल्यानंतर हर्षा भोगलेंनी धोनीशी संवाद साधला. मागे सोडून चाललेल्या वारशाचा तुला अभिमान वाटायला हवा, असं त्यावेळी भोगले म्हणाले. त्यावर मी अजून काहीच सोडलेलं नाही, असं उत्तर धोनीनं हसत हसत दिलं. त्यामुळे धोनी निवृत्ती स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट झालं.
पुढील पर्वात बीसीसीआय दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश करणार आहे. त्यामुळे बीसीसीआयवर सर्व अवलंबून आहे, असं धोनीनं म्हटलं. यावर हर्षा भोगले म्हणाले, नाही MS, हा निर्णय तुझ्या आणि CSK मधील आहे. धोनीनं यावरही स्पष्ट केलं की, चेन्नई सुपर किंग्सकडून मी खेळणार की नाही, हे महत्त्वाचं नाही. CSKसाठी काय सर्वोत्तम आहे, ते महत्त्वाचं आहे. कोअर ग्रुपनं १० वर्ष या टीमला सांभाळलं आणि आता पुढे संघहिताचे काय आहे, ते पाहायला हवं.