लखनौ : भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या लढतीत शनिवारी द. आफ्रिकेपुढे १३१ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करीत ६ बाद १३० धावा उभारल्या. हर्लिन देओलने ४७ चेंडूंत सहा चौकारांसह पहिले अर्धशतक गाठताना सर्वाधिक ५२ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जसने २७ चेंडूंत तीन चौकारांसह ३०, तर शेफाली वर्माने २२ चेंडूंत दोन चौकार आणि एका षट्कारासह २३ धावांचे योगदान दिले. कर्णधार आणि सलामीवीर स्मृती मानधना ११ धावा काढून बाद झाली.
हर्लिनने दुसऱ्या गड्यासाठी शेफालीसोबत ४५ आणि जेमिमासोबत तिसऱ्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी केली, तरीही अखेरच्या षटकात धावांची गती वाढविण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत नाणेफेक गमविणाऱ्या भारताला पॉवर प्लेमध्ये धावांचा वेग वाढविणे कठीण गेले. अखेरच्या तीन षटकांत केवळ १३ धावा निघाल्या.
द. आफ्रिकेकडून शबनीम इस्माईलने १४ धावा देत तीन फलंदाज बाद केले. कर्णधार स्मृतीने पहिल्या षटकात दोन चौकार ठोकून वेगवान सुरुवात केली. मात्र दुसऱ्या षटकात इस्माईलच्या चेंडूवर ती झेलबाद झाली. यानंतर शेफालीने एक टोक सांभाळल्याने सहा षटकात भारताच्या १ बाद ४१ धावा होत्या. शेफाली बाद झाल्यानंतर हर्लिनने ११व्या षटकापर्यंत रॉड्रिग्जसोबत बऱ्यापैकी धावा काढल्या. प्रतिस्पर्धी गोलंदाजीपुढे मोठा फटका मारण्याच्या नादात भारतीय खेळाडू बाद होत गेल्यामुळे अखेरच्या टप्प्यात धावगतीवर निर्बंध आले होते.
संक्षिप्त धावफलक भारत २० षटकांत ६ बाद १३० धावा (हर्लिन देओल ५२, जेमिमा रॉड्रिग्ज ३०, शेफाली वर्मा २३, स्मृती मानधना ११) गोलंदाजी : शबनिम इस्माईल ३/१४, एनेक बॉश २/११, नानकुलुलेको १/२८