सिलहट - डावखुरा तैजुल इस्लामच्या फिरकीपुढे फलंदाजांनी गुडघे टेकताच पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध यजमान बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर उभा राहिला. तैजुलने पहिल्या डावात चार आणि आता पुन्हा चार फलंदाजांना माघारी धाडले. विजयासाठी ३३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने दुसऱ्या डावांत ११३ धावांत ७ फलंदाज गमावताच बांगलादेश विजयापासून तीन बळींनी दूर आहे. अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला २१९ धावांची गरज असेल. अंधूक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला त्यावेळी डेरिल मिचेल ४४ आणि ईश सोढी ७ हे खेळपट्टीवर होते.
सलामीवीर डेवोन कॉन्वे २२, टॉम लॅथम ००, आणि पहिल्या डावातील शतकवीर केन विल्यमसन ११ धावा काढून परतला. हेन्री निकोल्स बाद होताच न्यूझीलंडची स्थिती ४ बाद ४६ झाली. यष्टिरक्षक टाॅम ब्लंडेल ६, ग्लेन फिलिप्स आणि काइल जेमिसन हेदेखील पाठोपाठ बाद झाले. मिचेल- सोढी यांनी अर्धा तास तैजुलचा सामना केला.
त्याआधी यजमान संघाने कालच्या ३ बाद २१२ वरून खेळताना ३३८ पर्यंत मजल गाठली. शंटो १०५ धावांवर बाद होताच बांगलादेशचे फलंदाज स्थिरावू शकले नाहीत. मुशफिकूर रहीमने मात्र ७९ चेंडूत २७ वे कसोटी अर्धशतक साजरे केले. शहादत हुसेन १८ धावा काढून परतला. अखेरचे तीन फलंदाज २७ धावांची भर घालून बाद झाले.
संक्षिप्त धावफलक :बांगलादेश : पहिला डाव : ३१०, न्यूझीलंड पहिला डाव : ३१७. बांगलादेश दुसरा डाव : १००.४ षटकांत सर्वबाद ३३८ (नजमुल शंटो १०५, मुशफिकूर रहीम ६७, मेहदी हसन मिराज नाबाद ५०, मोमिनूल ४०) गोलंदाजी : एजाज पटेल ४-१४८, ईश सोढी २-७४. न्यूझीलंड दुसरा डाव : ४९ षटकांत ७ बाद ११३ (डेरिल मिचेल खेळत आहे ४४, डेवोन कॉन्वे २२, ग्लेन फिलिप्स १२) गोलंदाजी : तैजुल इस्लाम २०-७-४०-४, शोरीफुल, मेहदी हसन, नईम हसन प्रत्येकी १-१ बळी.