गॉल - पदार्पण करणारा बेन फॉक्स याने झुंजार नाबाद ८७ धावांची खेळी करीत पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडचा डाव सावरला. त्याने ५ बाद १०३ अशा बिकट स्थितीत खेळाची सूत्रे घेत मंगळवारी खेळ संपला तेव्हा ८ बाद ३२१ धावा नोंदविण्यात मोलाची भूमिका बजावली.
फॉक्स याला जॉनी बेयरेस्टॉ फिट नसल्याने संधी मिळाली, याचा लाभ घेत त्याने सहाव्या गड्यासाठी जोस बटलरसोबत (३८) ६१ धावांची व सॅम कुरनसह(४८) सातव्या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी केली. दिग्गज फिरकीपटू रंगना हेरथ याचा हा अखेरचा सामना आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. फॉक्सने अखेरच्या सत्रात अर्धशतक पूर्ण केले. आदिल राशिदने ३५ धावा केल्या.
फिरकी गोलंदाज दिलरुवान परेरा याने ७० धावांत चार गडी बाद केले. खेळ थांबला त्यावेळी जॅक लीच १४ धावांवर नाबाद होता.
इंग्लंडची सुरुवात खराब झाली. रोरी बर्न्स (९) हा सुरंगा लकमलच्या चेंडूवर यष्टिमागे झेलबाद झाला. लकमलने पुढच्या चेंडूवर मोईन अलीची दांडी गूल केली. यानंतर रुटने कीटॉन जेनिंग्स (४६) सोबत ६२ धावांची भर घातली. (वृत्तसंस्था)
रुट ठरला हेरथचा शंभरावा बळी....
डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेरथ याने कर्णधार ज्यो रुट(३५) याला बाद करीत गॉल आंतरराष्टÑीय स्टेडियममध्ये शंभरावा बळी घेतला. एखाद्या मैदानावर शंभर गडी बाद करण्याचा विक्रम याआधी मुथय्या मुरलीधरन तसेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावे आहे. मुरलीधरनने गॉल, कॅन्डी आणि एसएससी कोलंबो येथे तर अँडरसनने लॉर्डस्वर हा विक्रम नोंदविला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ९१ षटकात ८ बाद ३२१ धावा (बेन फॉक्स खेळत आहे ८७, सॅम कुरन ४८, किटॉन जेनिंग्स ४६; दिलरुवान परेरा ४/७०, सुरंगा लकमल २/५७.)
Web Title: First Test: Ben Fox retreated to England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.