Join us  

पहिली कसोटी : कॅमेरून ग्रीनचा तडाखा, ऑस्ट्रेलियाची आघाडी; लंकेच्या फिरकीपटूंची दमछाक

त्यांची १०१ धावांची आघाडी झाली असून दोन फलंदाज शिल्लक आहेत. खेळ थांबला त्यावेळी कर्णधार पॅट कमिन्स २६ आणि नाथन लियोन ८ खेळपट्टीवर होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 10:57 AM

Open in App

 

गाले : कॅमेरून ग्रीन याने दणादण फटकेबाजी करीत ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी १०१ धावांची आघाडी मिळवून दिली. पाचव्या स्थानावर आलेल्या ग्रीनने १०९ चेंडूत सहा चौकारांसह ७७ धावा ठोकल्या. सलामीवीर उस्मान ख्वाजा (७१)आणि ॲलेक्स केरी(४५) यांनी यजमान फिरकीपटूंना दमवल्यामुळे ऑस्ट्रेलियाने लंकेच्या पहिल्या डावातील  २१२ धावांना उत्तर देत ८ बाद ३१३ धावांपर्यंत मजल गाठली.त्यांची १०१ धावांची आघाडी झाली असून दोन फलंदाज शिल्लक आहेत. खेळ थांबला त्यावेळी कर्णधार पॅट कमिन्स २६ आणि नाथन लियोन ८ खेळपट्टीवर होते. लंकेकडून ऑफ स्पिनर रमेश मेंडिस याने १०७ धावात चार, जेफ्री वंडरसे याने ८६ धावात दोन आणि धनंजय डिसिल्व्हाने एक गडी बाद केला.  दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ पावणे दोन तास उशिरा सुरू झाला.  ग्रीन- केरी यांनी ९३ चेंडूत ८४ धावांची वेगवान भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला वर्चस्व मिळवून दिले. त्याआधी अऑस्ट्रेलियाने कालच्या ३ बाद ९८ वरून खेळ सुरू केला. चहापानापर्यंत संघाने ५ बाद २३३ अशी वाटचाल केली होती.

पत्रे उडाली, स्टँड कोसळलेदुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी पाऊस आणि वादळी वाऱ्याने चांगलाच कहर केला.  सामनाही वेळेवर सुरू होऊ शकला नाही. यादरम्यान एक स्टँडही उखडला गेला. सुदैवाने हा स्टँड तात्पुरती व्यवस्था म्हणून उभारण्यात आला होता आणि अपघात झाला तेव्हा कोणीही उपस्थित नव्हते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याच्या सुमारे ९० मिनिटं आधी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला होता, त्यामुळे या स्टँडची मात्र चांगलीच पडझड झाली.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : पहिला डाव सर्वबाद २१२. ऑस्ट्रेलिया : पहिला डाव ६९ षटकात ८ बाद ३१८ धावा (उस्मान ख्वाजा ७१, कॅमरुन ग्रीन ७७, ॲलेक्स केरी ४५, डेव्हिड वॉर्नर २५, पॅट कमिन्स नाबाद २६) गोलंदाजी : रमेश मेंडिस ४/१०७, जेफ्री वंडरसे २/६८, धनंजय डिसिल्व्हा १/८. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाश्रीलंका
Open in App