नवी दिल्ली : अनेक खेळाडू जखमी असल्यामुळे इंग्लंडविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीसाठी अंतिम एकादशची निवड करताना भारताकडे अधिक पर्याय उपलब्ध नाहीत. जसप्रीत बुमराह याच्यासोबत दुसरा गोलंदाज कोण यासाठी मात्र युवा मोहम्मद सिराजविरुद्ध अनुभवी ईशांत शर्मा अशी चुरस असेल. भारताने मंगळवारी पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. नेहमी फिरकीला अनुकूल राहणारी चेपॉकची खेळपट्टी
लक्षात घेता येथे दोन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाज अशा संयोजनासह उतरण्याचे संकेत मिळाले.
बीसीसीआयच्या सूत्राने स्वत:चे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, ‘चेपॉकची खेळपट्टी पारंपरिक खेळपट्टीसारखीच आहे. यावर इंग्लंडमधील खेळपट्ट्यांसारखी लक्षणे दिसणार नाहीत. येथे हवामान दमट असल्याने सहज भेगा पटू नये यासाठी खेळपट्टीवर गवत ठेवण्यात येते. या खेळपट्टीवर नेहमीप्रमाणे फिरकीपटूंना लाभ मिळेल.’
अशावेळी जसप्रीत बुमराहला दुसऱ्या टोकाहून साथ देणारा वेगवान गोलंदाज म्हणून कोणाची निवड होईल, हे पाहण्यासाठी सर्वांची नजर असेल ती मुख्य कोच रवी शास्त्री, गोलंदाजी कोच भरत अरुण आणि कर्णधार विराट कोहली यांच्या निर्णयाकडे. ईशांत जवळपास वर्षभरापासून कसोटी खेळलेला नाही. दुसरीकडे सिराजने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शानदार कामगिरी केली होती. ब्रिस्बेनमध्ये पहिल्या डावात त्याने अर्धा संघ बाद केला.
चेन्नईत भारताने जिंकले पाच सामने
चेन्नईतील चिदम्बरम स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत नऊ कसोटी सामने झाले. त्यात भारताने पाच सामने जिंकले असून, इंग्लंडच्या वाट्याला तीन विजय आले. उभय संघांदरम्यान १९८२ ला झालेला सामना अनिर्णीत राहिला होता. भारताला डब्ल्ययूटीसी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा झाल्यास चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असा विजय मिळवावाच लागेल. यातील एक सामना गमावला तर अन्य तीन सामने मात्र जिंकावे लागतील. दुसरीकडे इंग्लंडने भारतावर ३-० ने विजय मिळविल्यास त्यांनाही संधी असेल. मालिका २-२ अशी अनिर्णीत सुटली तर मात्र गुणतालिकेत इंग्लंड संघ भारताच्या तुलनेत मागे राहील.
वॉशिंग्टन की अक्षर पटेल...
वॉशिंग्टनने ब्रिस्बेनमध्ये पदार्पणात अर्धशतकी खेळी केली शिवाय चार गडीही बाद केले होते. त्याच्या समावेशामुळे संघाला मोलाची मदत होणार आहे. अक्षरदेखील फलंदाजीत दमदार कामगिरी करीत असल्याने रवींद्र जडेजासारखा पर्यायी खेळाडू ठरू शकेल. दरम्यान, अष्टपैलू हार्दिक पांड्या हा आज बुधवारी क्वारंटाईनमधून बाहेर येईल. दीर्घकाळानंतर कसोटीसाठी निवड झालेला हार्दिक खासगी कारणांमुळे एक दिवस उशिरा येथे दाखल झाला होता. पांड्याला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही तरी आगामी विश्व कसोटी मालिकेचा अंतिम सामना तसेच त्याआधी वन डे मालिका पाहता त्याच्यावर अधिक ओझे टाकण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार नसावा.
Web Title: First Test: Young Siraj or veteran Ishant, ready for second fast bowler
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.