South Africa defeated New Zealand in Women's ODI World Cup : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिके महिलांनी गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली. यजमान न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजयासाठी १८ चेंडूंत १८ धावांची गरज असताना आफ्रिकेने महत्त्वाची विकेट गमावली, परंतु मॅरिझान्ने कॅप्प ( Marizanne Kapp ) एका बाजूने संघर्ष केला. ४ चेंडूंत १ धाव असताना कॅप्पने नवख्या अयाबोंगा खाकाला स्ट्राईक दिली. त्यानंतर किवींच्या सर्व खेळाडूंनी तिला घेराव घातला, परंतु खाकाने सुरेख फटका मारून विजयी धाव चोरली अन् विक्रमी विजयाची नोंद झाली. आफ्रिकेचा हा विजय भारतीय महिला संघासाठीही फायद्याचा ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव ४७.५ षटकांत २२८ धावांवर गडगडला. सोफी डेव्हिनने १०१ चेंडूंत ९३ धावांची खेळी केली, तिला अमेलिया केरच्या ४२ धावांची साथ मिळाली. आफ्रिकेकडून शबनिम इस्मैल ( ३-२७) व आयाबोंगा खाका ( ३-३१) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात लौरा वोल्वार्ड ६७ व स्यून लूस ५१ यांच्या अर्धशतकी खेळीने आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. पण, नंतर तळाचे खेळाडू झटपट बाद होत राहिल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली. कॅप्प एका बाजूने खिंड लढवत होती, परंतु तिला साथ देण्यासाठी कोणी थांबले नाही. १८ चेंडूंत १८ धावा हव्या असताना त्रिशा चेट्टी बाद झाली आणि त्यानंतर शबनिम इस्मैल माघारी परतली.
अखेरच्या षटकात विजयासाठी ६ धावांची गरज असताना कॅप्पने पहिलाच चेंडू चौकार खेचला अन् दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. खाका स्ट्राईकवर आल्यानंतर किवी खेळाडूंनी क्षेत्ररक्षण जवळ आणले. त्यातही खाकाने गॅप शोधली अन् एक धाव घेतली. या विजयानंतर आफ्रिकेच्या महिलांनी एकच जल्लोष केला. आफ्रिकेने प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत सलग चार विजय मिळवण्याचा विक्रम केला. याआधी त्यांनी बांगलादेश ( ३२ धावांनी विजय), पाकिस्तान ( ६ धावांनी विजय) आणि इंग्लंड ( ३ विकेट्स राखून विजय) यांना पराभूत केले.
महिला वर्ल्ड कप स्पर्धेत आफ्रिकेचा हा न्यूझीलंडवरील पहिलाच विजय ठरला. यापूर्वी २०००, २००९ व २०१३ वर्ल्ड कप स्पर्धेत आफ्रिकेला हार मानावी लागली होती. तसेच २१ व्या शतकात आफ्रिकेने ( पुरुष व महिला) वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाला २००३, २००७, २०११, २०१५ व २०१९ मध्ये न्यूझीलंडने पराभूत केले होते. आफ्रिकेच्या या विजयामुळे न्यूझीलंडची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे आणि भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर सरकला आहे आणि भारताला उर्वरित लढतीत विजय मिळवून उपांत्य फेरी गाठणे सोपे झाले आहे.