Ind vs SA, 1st ODI: भारतीय संघाचा नवा कर्णधार केएल राहुल याने आफ्रिका दौऱ्यावरील वन डे मालिकेतील पहिलीच नाणेफेक गमावली. आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीला दमदार कामगिरी केली, पण नंतर आफ्रिकेच्या बावुमा-डुसेन जोडीने भारतीयांच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. भारताकडून अंतिम ११ जणांच्या संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झाले. त्यांच्यासोबतच शिखर धवन, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले. तर IPL स्टार व्यंकटेश अय्यरला वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली. आज भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एक वेगळी गोष्ट घडली.
पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट
भारताच्या संघात सलामीवीर म्हणून रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांना संधी देण्यात आली. वॉशिंग्टन सुंदरलाही १८ जणांच्या चमूत समाविष्ट करण्यात आले होते. पण तो दुखापतग्रस्त झाल्याने अश्विन-चहल जोडी संघात आली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अश्विन आणि चहल ही जोडी पहिल्यांदाच टीम इंडियात एकत्र खेळली. याआधी युजवेंद्र चहलला संघात सातत्याने स्थान मिळाल्याने अश्विन संघाबाहेर गेला होता. पण आज दोघांनाही संघात स्थान मिळालं.
राहुलने केला मोठा पराक्रम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करताना केएल राहुलने पराक्रम केला. कर्णधार म्हणून मैदानात उतरताच राहुल हा 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये कर्णधार न होता थेट ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये देशाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या मोजक्या कर्णधारांपैकी एक ठरला. यापूर्वी माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी आणि आक्रमक माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी ही कामगिरी केली होती. त्यात आता राहुलची भर पडली.