ललित झांबरे : न्यूझीलंडविरुध्दच्या तिसऱ्या कसोटीत सिडनी येथे आॕस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबूशेन व स्टिव्ह स्मिथ ही जोडी शुक्रवारी चांगलीच जमली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 156 धावांची भागीदारी केली. दरम्यान लाबूशेनने शतक आणि स्मिथने अर्धशतकही साजरे केले. पण ही जोडी यापेक्षाही वेगळ्या कारणांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात विशेष ठरली.
ती यासाठी की भागिदारीतील दोन्ही फलंदाजांची सरासरी 60 पेक्षा अधिक होती आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच खेळपट्टीवर असलेले दोन्ही फलंदाज 60 पेक्षा अधिक धावांची सरासरी राखणारे होते. स्मिथची शुक्रवारची 63 धावांची खेळी पकडून त्याची सरासरी आता 62.84 आहे तर लाबूशेनच्या नाबाद 130 धावानंतर त्याची सरासरी 62.61 आहे. या डावाआधी लाबूशेनची सरासरी 56.42 तर स्मिथची सरासरी 62.34 होती. या खेळीत लाबूशेनने 75 धावा करताच त्याची सरासरी 60 च्यावर पोहोचली आणि खेळपट्टीवर स्मिथ व लाबूशेन हे दोन्ही 60 च्यावर सरासरी राखणारे फलंदाज खेळताना दिसले.
याच्या जवळपास पोहोचलेली जोडी होती आॕस्ट्रेलियाचीच रिकी पोंटींग व माईक हसीची. 2006-07 च्या अॕडिलेड अॕशेस कसोटीत रिकी पोंटींगची सरासरी 59.98 होती आणि माईक हसीची सरासरी 53.14 ची होती. पण दोन्ही फलंदाज 60 च्यावर सरासरी राखणारे स्मिथ व लाबूशेन हे पहिलेच असावेत.