नवी दिल्ली : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेन्टी-20 सामना 3 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये होणार आहे. रिषभ पंतचे तर हे घरचे मैदान आहे. पण तरीही या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या बऱ्याच दौऱ्यांमध्ये पंतला संधी देण्यात आली. पण तो गेल्या बऱ्याच सामन्यांमध्ये अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यापुढे पंताला संधी द्यायची का, हा सर्वात मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे असेल.
महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून पंतची संघात निवड करण्यात आली होती. पण पंत हा फक्त स्टाइल मारण्यामध्येच अग्रस्थानी असल्याचे पाहायला मिळाले. पंतकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली नाही. पंत हा प्रत्येकवेळी धोनीची कॉपी करताना दिसला आणि त्यामध्येच तो आपले अस्तित्व गमावून बसला, असे म्हटले जात आहे.
आपल्या घरच्या मैदानात पंतला यावेळी संधी मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे. पंतऐवजी या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. पंत सध्या फॉर्मात नाही, तर दुसरीकडे संजूची कामगिरी चांगली राहीलेली आहे. त्यामुळे या सामन्यासाठी संजू ही संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती असेल.