Join us  

सुरुवातीचे दोन पराभव भारताला महागडे ठरू शकतात!

- अयाज मेमनसोप्या ग्रुपमध्ये समावेश झाल्यानंतरही टीम इंडियाने पहिल्या दोन्ही सामन्यात सुमार कामगिरी केली. विशेषत: न्यूझीलंडविरुद्ध... यामुळे पाकिस्ताननंतर ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 8:23 AM

Open in App

- अयाज मेमन

सोप्या ग्रुपमध्ये समावेश झाल्यानंतरही टीम इंडियाने पहिल्या दोन्ही सामन्यात सुमार कामगिरी केली. विशेषत: न्यूझीलंडविरुद्ध... यामुळे पाकिस्ताननंतर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा गटातील दुसरा संघ कोणता, याबाबत चुरस आहे. भारत, न्यूझीलंड की अफगाणिस्तान? याचे उत्तर रविवारी रात्री न्यूझीलंड- अफगाणिस्तान सामन्यातील निकालानंतरच मिळू शकेल!

न्यूझीलंडने अफगाणला नमविले तर ते उपांत्य फेरी गाठतील. अफगाणिस्तनला उपांत्य फेरीत धडक द्यायची झाल्यास भारताला दूर ठेवण्यासाठी न्यूझीलंडवर मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. भारताने स्कॉटलॅन्डला शुक्रवारी आठ गड्यांनी नमवून धावगतीत अफगाण आणि न्यूझीलंडला मागे टाकून धूसर शक्यता निर्माण केली आहे. त्यानंतर सोमवारी भारत-नामिबिया हा सामना खेळला जाईल.भारताने अफगाण आणि स्कॉटलॅन्डविरुद्ध दमदार विजय नोंदविले खरे पण पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवांमुळे जी अनिश्चितता निर्माण झाली, त्याची सल कायम राहणार आहे. अफगाण आणि स्कॉटलॅन्ड बलाढ्य नाहीत हे मान्य, पण भारतीय संघाचे काय? पाकिस्तान आणि पाठोपाठ न्यूझीलंडने केलेले दारुण पराभव पचविण्यासारखे आहेत?

भीती आणि अपयशामुळे गरज नसताना सलामी जोडीत बदल झाले. रोहितला तिसऱ्या स्थानावर पाठविण्यात आले. पाॅवर प्लेमधील दिग्गजांचे नांगी टाकणे, ईश सोढी आणि मिशेल सॅन्टनर यांच्या फिरकी माऱ्यापुढे फलंदाजी ढेपाळणे या सर्व कारणांमुळे ११० धावात गारद होण्याची नामुष्की ओढवली होती. दरम्यान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील रविवारच्या सामन्यावर या विश्वचषक स्पर्धेतील भारताचे भवितव्य ठरेल. निकाल येताच कोणता संघ पुढे सरकेल, हे निश्चित होईल. नामिबियाविरुद्ध भारताचा शेवटचा सामना प्रासंगिक असेल का? हेदेखील स्पष्ट होईल.

ग्रुप एकमध्ये सर्व सहा संघ बलाढ्य असून दोनमध्ये मात्र तीनच संघ चांगले आहेत. अशावेळी भारताने पाक किंवा न्यूझीलंडला नमविणे गरजेचे होते. त्यामुळे सध्या जी स्थिती ओढवली त्यापासून सुटका होऊ शकली असती.  तर, काय झाले ? आयपीएलमधील थकवा, जैव-सुरक्षित बबलमधीेल वास्तव्य यामुळे  सुरुवातीला धक्के बसले असावेत यात शंका नाही  तथापि ही स्थिती केवळ भारतापुरती मर्यादित नाही. सर्वच संघ यातून जात आहेत. भातीय संघाचा चाहता वर्ग मोठा असल्याने दडपणही असणारच. पण हे नवे नाही. तुमच्या कर्तबगारीचे मोठे बक्षीस तुम्हाला मिळतेच. त्यामुळे लौकिकानुसार कामगिरी करण्यात आलेल्या अपयशाला कारणे नकोत!

सत्य असे आहे की भारताचा द्विपक्षीय मालिकेत सर्वच प्रकारात रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पण आयसीसी स्पर्धांमधील २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदानंतर सतत माघार होते आहे. २०१५ आणि २०१९ चा वन डे विश्वचषक, २०१६ चा टी-२० विश्वषचक, २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना या सर्वांमध्ये घोर निराशा पदरी पडली. द्विपक्षीय मालिकेत चांगला खेळ करणारे हेच खेळाडू आयसीसी स्पर्धांमध्ये का माघारतात? नवे कोच राहुल द्रविड यावर तोडगा काढू शकतील पण सध्याच्या विश्वचषकाचे काय? विराट कोहलीच्या नेतृत्वाचा मुद्दा महत्त्वाचा नाही. 

टॅग्स :भारतविश्वचषक ट्वेन्टी-२०
Open in App