नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला. मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त ठरला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना पंजाबविरुद्धच्या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर केदारने आयपीएलमधून माघारही घेतली होती.
टीम इंडियाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी गुरुवारी त्याला फिट घोषित केले. केदारच्या दुखापतीवर आधीपासून त्यांचीच नजर होती. त्यांनी ही जखम फारशी गंभीर नसून तो विश्वचषकाआधी बरा होईल, असे म्हटले होते. त्यानुसार केदारच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पॅट्रिक फरहार्ट यांनी बीसीसीआयला केदारच्या तंदुरुस्तीचा अहवाल सादर केला. आता केदार संघासोबत २२ मे रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केदार काही दिवस वास्तव्याला होता. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी येथील प्रशिक्षण केंद्रात केदारने पॅट्रिक फरहार्ट यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी सकाळी फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या उत्तीर्ण करीत विश्वचषकासाठी स्थान पक्के केले.केदारच्या अनुपस्थितीत अंबाती रायुडू-अक्षर पटेल यांची नावे चर्चेत आली होती.
गेल्या काही वर्षांत केदारने फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करीत संघात स्थान निश्चित केले आहे. अनेकदा प्रतिस्पर्धी संघाची जमलेली जोडी फोडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यामुळे या स्पर्धेत केदार कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या गेमप्लानमधील केदार हा महत्त्वाचा खेळाडू आहे. तो चांगला फलंदाज आहे सोबत उपयुक्त गोलंदाजीही करू शकतो.सलामीचा सामना ५ जूनलाआयसीसी नियमानुसार १५ सदस्यांच्या सुरुवातीच्या संघात २३ मेपर्यंत बदल शक्य आहे. भारताला विश्वचषकात सलामीचा सामना ५ जून रोजी द.आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. त्याआधी २५ आणि २८ मे रोजी क्रमश: न्यूझीलंड आणि बांगला देशविरुद्ध सराव सामने आयोजित करण्यात आले आहेत.
- केदार जाधवने आतापर्यंत ५९ वन-डेत ४० डावात फलंदाजी करताना ११७४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४३.५ असून स्ट्राईक रेट १०२.५ आहे. टी२० मध्ये त्याने ९ सामन्यात १२२ धावा केल्या आहेत.
- अष्टपैलू केदारने ३६ डावात गोलंदाजी करताना
- २७ बळीदेखील घेतले आहेत. त्याने २३ धावात तीन बळी ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.
- ३४ वर्षीय केदार जाधवचा हा पहिलाचविश्वचषक आहे.