दुबई : भारतीय खेळाडूंनी अपेक्षेनुसार अंडर १९ वर्ल्डकप संघात आपला दबदबा कायम ठेवला. आयसीसीच्या आज जाहीर झालेल्या विश्व एकादश संघात वर्ल्डचॅम्पियन भारतीय संघाच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. भारताने शनिवारी न्यूझीलंडच्या माऊंट माऊनगुनई येथे झालेल्या फायनलमध्ये आॅस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव करताना अंडर १९ वर्ल्डकप जिंकला होता.
विश्व एकादश संघात भारताचे अव्वल तीन फलंदाज कर्णधार पृथ्वी शॉ (२६१ धावा), फायनलमधील सामनावीर मनजोत कालरा (२५२ धावा) आणि मालिकावीर शुभमान गिल (३७२ धावा) यांचा समावेश आहे. या फलंदाजांशिवाय डावखुरा फिरकी गोलंदाज अंकुश राय (१४ विकेट) आणि वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी (९ बळी)
यांनाही विश्व एकादश संघात स्थान मिळाले आहे.
आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप संघाची निवड पाच सदस्यीय समितीने केली आहे. या समितीत वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप, माजी महिला कर्णधार अंजुम चोप्रा, न्यूझीलंडचा माजी कर्णधार जेफ क्रो, पत्रकार शशांक किशोर आणि माजी आॅस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू टॉम मुडी यांचा समावेश होता. मनोरंजक बाब म्हणजे या संघात उपविजेत्या आॅस्ट्रेलिया संघातील एकाही खेळाडूला स्थान देण्यात आलेले नाही.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार रेनॉर्ड वॉन टोंडर याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्याने ६ सामन्यांत ३४८ धावा केल्या आहेत. त्यात केनियाविरुद्ध १४३ धावांच्या खेळीचा समावेश आहे. टोंडरशिवाय द. आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज वैंडिल माकवेतू आणि वेगवान गोलंदाज गेरॉल्ड कोएटजी यांचाही संघात समावेश आहे.
>आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप संघ
(फलंदाजी क्रमानुसार) - पृथ्वी शॉ, मनजोत कालरा, शुभमान गिल (तिघेही भारतीय), फिन एलेन (न्यूझीलंड), रेनार्डवान टोंडर (दक्षिण आफ्रिका, कर्णधार), वैंडिल माकवेतू (दक्षिण आफ्रिका, यष्टिरक्षक), अंकुल राय, कमलेश नागरकोटी (दोघेही भारत), गेराल्ड कोएटजी (दक्षिण आफ्रिका), कैस अहमद (अफगाणिस्तान), शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान). १२ वा खेळाडू : एलिक अथांजे (वेस्ट इंडीज).
Web Title: In the five Indian Under-19 World Cup squad along with Prithvi, Kalra, Gil
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.