भारत विरुद्ध इंग्लंड मालिका १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र भारताने पाच सामन्यांच्या तीन कसोटी मालिकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाबरोबर ०-० अशी बरोबरी साधली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये असा प्रकार पाच वेळा घडला आहे. त्यापैकी तीन वेळा मालिका ०-० अशी भारतानेच बरोबरीत सोडवली.
१९६३-६४ च्या सत्रात भारताच्या संघाने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-० अशी बरोबरी साधली. यजमान भारताने या मालिकेत एकही सामना जिंकला नाही किंवा गमावलाही नव्हता. मन्सुर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने ही मालिका रटाळ पद्धतीने संपवली. मालिकेतील अखेरचा सामना रंजक ठरला होता. १५ फेब्रुवारी कानपूरच्या ग्रीन पार्कवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या संघाने बॅरी नाईट (१२७ धावा) आणि पीटर पॅरफिट (१२१ धावा) यांच्या शतकांच्या जोरावर ५५९ धावा केल्या.
इंग्लंडचे कर्णधार माईक स्मिथ यांनी ८ गडी बाद झाल्यावर आपला पहिला डाव घोषित केला. आता पाळी भारताची होती. पतौडी यांचा संघ फक्त २६६ धावातच बाद झाला. साहजिकच फॉलोऑन मिळाल्यावर भारताने दुस-या डावात बापू नाडकर्णी यांचे नाबाद शतक (१२२ धावा), दिलीप सरदेसाई (८७ धावा), यष्टीरक्षक कुंदेरन (५५ धावा) आणि सलीम दुराणी यांनी ६१ धावा करत संघाचा पराभव टाळला.
बापू नाडकणी यांनी शतकासाठी तब्बल ४१८ चेंडूंचा सामना केला. दिलीप सरदेसाई यांनीही २४४ चेंडू तर कुंदेरन यांनी १६५ चेंडूंचा सामना केला. सलीम दुराणी त्या स्थितीतही आजच्या टी -२० प्रमाणे खेळले त्यांनी ३४ चेंडूतच पाच चौकार आणि चार षटकार लगावत आपला दम दाखवला. इंग्लंडच्या स्मिथ यांनी तर कमालच केली त्यांनी दुस-या डावात भारतीय फलंदाजांना बाद करण्यासाठी तब्बल दहा गोलंदाज वापरले. अर्थात यष्टीरक्षकाला गोलंदाजी येत नाही म्हणून त्याला वापरले नसावे, एवढे गोलंदाज वापरूनही भारताच्या संयमी आणि चिवट फलंदाजांनी इंग्लंडला यश मिळू दिले नाही.
त्या आधी भारताने १९५४-५५ च्या आणि १९६०-६१ च्या सत्रात पाकिस्तान विरोधातील पाच कसोटी सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरीत संपवली होती.
Web Title: Five match series still 0-0!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.