मुंबई - सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज. सचिन हा भारताचा राष्ट्रीय नायक आहे, तर धोनीने भारताच्या ध्वजधारकाची भूमिका वटवली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंचे स्वतःचे एक अढळ स्थान आहे. दोन वेगवेगळ्या जनरेशनमधील या दोन दिग्गज खेळाडूंनी नोंदवलेल्या विक्रमांत असे काही साम्य आढळले आहेत, की त्याने क्रिकेटचाहते चक्रावून जातील.
- तेंडुलकर आणि धोनी यांच्यासाठी या तारखांचे विशेष महत्त्व आहे. 15 एप्रिल 2011 मध्ये सचिनने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोची टस्कर्स केरळा संघाविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या. ती त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी आहे. याच दिवशी, परंतु सात वर्षांनंतर धोनीने आयपीएलमधली त्याची सर्वोत्तम नाबाद 79 धावांची खेळी साकारली. आश्चर्याची बाब म्हणजे दोघांच्या या वैयक्तिक खेळीनंतरही त्यांच्या संघांना हार पत्करावी लागली.
- 24 फेब्रुवारी 2010 मध्ये तेंडुलकरने वन डेतील सर्वोत्तम नाबाद 200 धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ग्वालियर येथे 200 धावा चोपल्या होत्या. तीन वर्षांनंतर याच दिवशी धोनीने कसोटी कारकिर्दीतील त्याची सर्वोत्तम खेळी साकारली. धोनीने चेन्नई कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 224 धावा केला. यावेळी भारताने विजय मिळवला.
- तेंडुलकर आणि धोनी यांनी वन डे क्रिकेटमध्ये 7000 धावांचा पल्ला 189 व्या डावातच गाठला आहे. त्याशिवाय त्यांनी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पणही एकाच सामन्यातून केले आहे.
- दोघांनीही तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील मिळून शंभरावे आंतरराष्ट्रीय अर्धशतक ऑस्ट्रेलियाविरूद्ध पूर्ण केले. कर्णधार म्हणून वन डे क्रिकेटमध्ये दोघांच्या नावावर प्रत्येकी सहा शतकं आहेत.
- तेंडुलकर आणि धोनी यांच्या वन डे कारकिर्दीच्या सुरूवातीतही समानता आहे. दोघांना पदार्पणाच्या सामन्यात भोपळा फोडता आला नव्हता. 1989 साली पाकिस्तानविरुद्ध सचिनला, तर 15 वर्षानंतर बांगलादेशविरुद्ध पदार्पणाच्या लढतीत धोनी शुन्यावर धावबाद झाला होता.