पल्लीकल : इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होणाºया विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे स्वरूप आगामी पाच महिन्यांत स्पष्ट होईल, असे संघ निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी स्पष्ट केले.
श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व उमेश यादव यांच्याव्यतिरिक्त रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली. प्रसाद म्हणाले, या खेळाडूंना रोटेशन नीतीनुसार विश्रांती देण्यात आली आहे. आम्ही काही खेळाडूंना आगामी चार-पाच महिन्यांत रोटेशन नीतीनुसार संधी देणार आहोत.
कसोटी मालिकेत श्रीलंकेचा ३-० ने सफाया केल्यानंतर प्रसाद म्हणाले, ‘आम्ही प्रमुख खेळाडूंना रोटेशन व विश्रांती देण्याच्या नीतीवर कार्य करीत आहोत. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये युवा खेळाडूंच्या कामगिरीचे आकलन करता येईल. या वर्षाअखेरीस संघाचे स्वरूप स्पष्ट होईल.’ प्रसाद पुढे म्हणाले, ‘विश्वकप संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह युवराज सिंग व सुरेश रैना यांचाही समावेश आहे.’ ऋषभ पंतबाबत बोलताना प्रसाद म्हणाले, ‘टी-२० क्रिकेटमध्ये तो चांगला खेळाडू असल्याची आपल्याला कल्पना आहे. आम्ही त्या प्रकारामध्ये त्याची चाचणी घेऊ. हार्दिक पांड्याने टी-२० मध्ये ओळख निर्माण केल्यानंतर कसोटी संघापर्यंतचा पल्ला गाठला आहे.
मी प्रामाणिकपणे सांगेल. चर्चा प्रत्येक खेळाडूची होती. असं नाही की केवळ महेंद्रसिंग धोनीचीच चर्चा झाली. जेव्हा संघ निवडला जातो तेव्हा आम्ही संघाचा ताळमेळ राखण्यावर भर देतो. यासाठी आम्ही प्रत्येक खेळाडूवर चर्चा करतो. धोनीच्या भविष्याबाबत बोलणे कठिण आहे. मात्र, जोपर्यंत तो संघाच्या कामगिरीत योगदान देत राहणार तोपर्यंत त्याच्या भविष्याची नक्कीच चिंता नसेल. धोनीबाबतही चर्चा झाली. एक मात्र नक्की की धोनीची कामगिरी खालावली तरच त्याच्या पर्यायाचा विचार होईल. फिटनेससाठी काही निकष ठरविण्यात आले असून, त्याचे सर्व खेळाडूंना पालन करावे लागेल. खेळाडूंच्या तंत्राचा विचार करता भारतीय संघ जगात अव्वल स्थानी आहे; पण फिटनेसवर मेहनत घेण्याची गरज आहे.
- एमएसके प्रसाद, निवड समिती अध्यक्ष
>युवराजसाठी अद्याप दरवाजे बंद झालेले नाहीत
युवराज सिंगला विश्रांती देण्यात आली असून, त्याच्यासाठी संघाचे दरवाजे बंद झालेले नाही, असे निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी सांगितले.
Web Title: In five months, the form of the World Cup team will be clear: Prasad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.