Join us  

पाकिस्तानचा फिक्सर देतोय नैतिकतेचे धडे! दीप्ती शर्माला 'चिटर' म्हणणाऱ्या Mohammad Asifवर टीका

भारतीय महिला संघाने दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीला इंग्लंडमध्ये ऐतिहासिक वन डे मालिका जिंकून विजयी भेट दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 10:39 AM

Open in App

भारतीय महिला संघाने दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीला इंग्लंडमध्ये ऐतिहासिक वन डे मालिका जिंकून विजयी भेट दिली. गोस्वामीची ही अखेरची वन डे मालिका होती आणि तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारतीय महिलांनी प्रथमच इंग्लंडमध्ये इंग्लंडला वन डे मालिकेत ३-० असे पराभूत केले. पण, लॉर्ड्सवर झालेल्या तिसरा वन डे सामना चर्चेत आला तो भारतीय फिरकीपटू दीप्ती शर्मा ( Deepti Sharma) हिच्या मांकडिंगमुळे. इंग्लंडला विजयासाठी ३८ चेंडूंत १७ धावा करायच्या होत्या आणि एक विकेट हातात होती. ४४व्या षटकात दीप्तीने मांकडिंग करताना चार्लोट डीन ( Charlotte Dean) रन आऊट केले आणि भारताने तो सामना जिंकला. दीप्तीच्या या मांकडिंगवरून इंग्लंडच्या खेळाडूंनी टीका केली, त्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आसिफ ( Mohammad Asif ) यानेही वादात उडी मारली. त्याने भारतीय गोलंदाजाला चिटर म्हटले आणि त्यानंतर भारतीयांनी त्याला सडेतोड उत्तर दिले.

दीप्ती शर्माने कसे बाद केले ?१६९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे ९ फलंदाज ११८ धावांत माघारी परतले होते. त्यानंतर चार्लोट डीन हिने अखेरच्या सहकाऱ्यासह ३५ धावा जोडत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. दीप्ती शर्मा हिने ४४ व्य षटकात डीन हिला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले आणि इंग्लंडच्या झुंजीवर पाणी फिरवले. ४४ व्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी दीप्ती शर्मा हिने बॉलिंग मार्कवरून धावण्यास सुरुवात केली असतानाच यष्ट्यांजवळ आल्यावर नॉन स्ट्राईकवर असलेली डीन ही लाईनच्या बाहेर असल्याचे दीप्तीला दिसले आणि तिने संधी साधून मागे वळत बेल्स उडवून डीनला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले.  नव्या बदलानुसार अशा पद्धतीने बाद करण्यास आयसीसीने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे डीन बाद ठरली.

मोहम्मद आसिफने ट्विट करून दीप्तीला चिटर म्हटले. त्याने लिहिले की, आपण पाहू शकतो की दीप्तीने गोलंदाजी करण्याची कृतीच केली नाही. ती नॉन स्ट्रायकरकडेच पाहत होती आणि चिटिंग केली. खिलाडूवृत्तीला बट्टा लावणारी ही कृती आहे.  

मोहम्मद आसिफ हा पाकिस्तानचा वेगवाग गोलंदाज होता. २००५मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले. २००६मध्ये स्टेरॉईड घेतल्याप्रकरणात तो दोषी आढळला. त्यानंतर तो फिक्सिंगमध्ये दोषी आढळला णि त्याच्यावर ७ वर्षांची बंदी घातली गेली. त्याच्यासोबत सलमान बट व मोहम्मद आमीर हेही दोन पाकिस्तानी खेळाडू दोषी ठरले. एक वर्ष आसिफ जेलमध्येही होता. 

 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंडआयसीसीपाकिस्तान
Open in App