लाहोर - पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराची प्रकरणं वाढू लागली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हल्लीच ३५ वर्षीय लेगस्पिनर आसिफ आफ्रिदीवर भ्रष्टाटार प्रतिबंधक संहितेंतर्गत क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. पीसीबीकडून या प्रकरणाची शहानिशा सुरू असतानाच अजून दोन क्रिकेटपटू संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत. मात्र या क्रिकेटपटूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. हे दोन्ही क्रिकेटपटू दोषी आढळल्यास बोर्ड त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आफ्रिदी हा एकटा सहभागी असू शकत नाही, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे. पीसीबीने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना मुझफ्फराबाद येथे रवाना केले आहे.
आफ्रिदी डाव्या हाताचा फिरकीपटू आहे. त्याने हल्लीच नॅशनल टी-२० स्पर्धेत सहभाग घेतला होता. पीसीबीकडून सांगण्यात आले की, आसिफ आफ्रिदी याला पीसीबीच्या कोड ऑफ कंडक्टच्या आर्टिकल २.४ अन्वये दोन नियमभंगांसाठी नोटिस जारी करण्यात आली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्याच्याविरोधात तपास सुरू आहे. तसेच निर्णय येईपर्यंत पीसीबी या प्रकरणात काही बोलणार नाही.
आसिफ आफ्रिदी याला पाकिस्तानने यावर्षी केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले होते. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तो १३ वर्षांपासून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत आहे. त्याने ३५ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ११८ बळी टिपले आहेत. तर १ शतक आणि आठ अर्धशतकांसह १३०३ धावा काढल्या आहेत.