नवी दिल्ली : भारतात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिल्यास फिक्सिंगला प्रोत्साहन मिळेल, असे परखड मत व्यक्त करीत भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) भ्रष्टाचार विरोधी पथकाचे नवे प्रमुख शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी लहानात लहान लीगमधून संशयास्पद हालचालींचे समूळ उच्चाटन करणे हे आपल्यापुढील मोठे आव्हान असल्याचे सोमवारी सांगितले.
काहींच्या मते सट्टेबाजी वैध केल्यास सरकारला मोठा कर मिळेल. ७० वर्षांचे खंडवावाला मात्र या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. ते म्हणाले, सरकारने सट्टेबाजीला मान्यता द्यावी की नाही हा वेगळा विषय आहे. मात्र, पोलीस अधिकारी म्हणून यामुळे फिक्सिंगला चालना मिळेल, हे सांगू शकतो. सट्टेबाजी कायदेशीर न करण्याचा सरकारचा निर्णय योग्यच आहे. सट्टेबाजी फिक्सिंगला प्रोत्साहन देत असल्याने यात बदल होऊ नये. आम्ही नियम अधिक कठोर करू इच्छितो. आम्ही यावर काम करू. भारतीय क्रिकेट भष्टाचारमुक्त आहे, ही आमच्यासाठी प्रतिष्ठेची बाब म्हणावी लागेल.
बीसीसीआयच्या एसीयूचे मावळते प्रमुख अजितसिंग यांच्या मते, सट्टेबाजीला वैधता प्रदान करणे हा खेळातील भ्रष्टाचार रोखण्याचा उपाय आहे. केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी देखील मागच्या वर्षी सट्टेबाजी वैध करण्याचा सल्ला दिला होता.
‘आयपीएलसारखे सामने भ्रष्टाचारमुक्त आहेत, मात्र स्थानिक आणि राज्य टी-२० लीगमध्ये भ्रष्टाचाराचीे प्रकरणे पुढे येत आहेत. टी-२० सारखा प्रकार लोकप्रिय होत असल्यामुळे लहान स्तरावर सट्टेबाजी होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. आमच्या खेळाडूंना चांगला पैसा मिळत असल्याने ते फिक्सिंगसारख्या प्रकारापासून दूर असल्याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. देशात जे क्रिकेट खेळले जाते, जे शंकामुक्त आहे, याची खातरजमा करावी लागेल, असे मत खंडवावाला यांनी व्यक्त केले. बीसीसीआयशी जुळताच खंडवावाला यांच्यापुढील पहिले आव्हान ९ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएलमधील सट्टेबाजी रोखणे हे असेल.
कोण आहेत खंडवावाला
बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्त झालेले शब्बीर हुसेन एस. खंडवावाला हे गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आहेत. १९७३च्या बॅचचे आयपीएल अधिकारी असलेले खंडवावाला अजितसिंग यांचे स्थान घेतील. डिसेंबर २०१०ला ते पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले. दहा वर्षे ते एस्सार समूहाचे सल्लागार होते. केंद्र शासनाच्या लोकपाल शोध समितीचेदेखील ते सदस्य राहिले. बीसीसीआयने यावेळी पदासाठी जाहिरातीद्वारे अर्ज न मागविताच ही नियुक्ती केली, हे विशेष.
‘सट्टेबाजी काही देशांत वैध असेलही; मात्र काहीजण सामना पाहायला जातात किंवा टीव्हीवर सामना पाहतात तेव्हा खेळावर त्यांचा विश्वास असतो. सामना फिक्स आहे, असे समजून ते मैदानावर जाण्याचे टाळत नाहीत. आम्हाला अशा चाहत्यांचा विश्वास संपादन करायचा आहे. क्रिकेट सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारातून मुक्त असायला हवा.’ -शब्बीर खंडवावाला,एसीयू प्रमुख
Web Title: "Fixing will be encouraged if betting is legalized."
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.