यंदाच्या आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं चेन्नई सुपरकिंग्सचं कर्णधारपद सोडत CSKच्या कोट्यवधी चाहत्यांना धक्का दिला होता. पण कर्णधारपद सोडल्यानंतरही चेन्नईच्या संघातील धोनीचं स्थान आणि महत्त्व कायम आहे. तसेच वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही धोनीची तंदुरुस्ती वाखाणण्यासारखी आहे. यष्टीमागची त्याची चपळता १० वर्षांपूर्वी होती तशीच अजूनही आहे. आज गुजरातविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना त्याचाच अनुभव आला.
सामन्यात गुजरातचा डाव सुरू असताना डावातील आठव्या षटकात डेरेल मिचेलच्या गोलंदाजीवर धोनीने विजय शंकरचा अप्रतिम झेल टिपला. मिचेलने टाकलेल्या आठव्या षटकातील तिसरा चेंडू विजय शंकरच्या बॅटची कड घेऊन यष्ट्यांमागे गेला तिथे धोनीने सूर मारून झेल पकडला. धोनीची चपळता पाहून सारेच अवाक् झाले. झाले आता धोनीने टिपलेल्या ह्या झेलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सने २० षटकांत ६ बाद २०६ धावा फटकावल्या आणि गुजरातसमोर विजयासाठी २०७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची अवस्था बिकट झाली आहे. १०० धावांचा टप्पा ओलांडण्यापूर्वीच गुजरातचे ४ फलंदाज माघारी परतले आहेत.