अयाझ मेमन
प्रमुख फलंदाज बाद झालेले असताना दुसरा सामना जिंकणे भारतासाठी खूप कठीण होते. हनुमा विहारी आणि रिषभ पंत नक्कीच गुणवान खेळाडू आहेत, पण त्यांच्याकडे अद्याप पुरेसा अनुभव नाही. त्यामुळे भारताला विजय मिळवण्यासाठी या दोघांना पूर्ण एक सत्र किंवा दोन सत्र खेळण्याची आवश्यकता होती. पण दोघेही लवकर बाद झाले आणि भारताची तळाची फळी खूपच कमजोर असल्याने संघाचा डावही झटपट गुंडाळला गेला. ज्या खेळपट्टीवर तुमचे प्रमुख फलंदाज टिकू शकले नाहीत, तिथे गोलंदाजांकडून संयमी खेळाची अपेक्षा करणे चुकीचेच आहे.
खेळाबरोबरच या सामन्यात स्लेजिंगनेही लक्ष वेधले. जर खरंच स्लेजिंग झाली असेल, तर ती खेळासाठी नक्कीच नुकसानदायक ठरेल. कोहली-पेन या कर्णधारांमध्ये झालेली बातचीत याचाच एक भाग असल्याचे म्हणता येईल. यामुळे खेळावरून लक्ष कमी होते. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, आॅसी खेळाडूंना याची सवय आहे. देशांतर्गत स्पर्धेत ते आपापसांत स्लेजिंग करत असतात. पण त्यामानाने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशी परंपरा नाही. असे असले तरी खेळाडूंमध्ये बाचाबाची होत नाही, असेही नाही. पण भारतीय क्रिकेटमध्ये स्लेजिंग प्रकार कधी पाहण्यास मिळालेला नाही. त्यामुळेच जर भारतीय खेळाडू स्लेजिंगवर भर देत असतील, तर नक्कीच त्यांचे खेळावरील लक्ष हटू शकते. पहिली कसोटी आपण जिंकलो, कारण आपले पूर्ण लक्ष खेळावर होते. आता उर्वरित दोन सामने जिंकण्यासाठीही आपल्याला असाच लक्षपूर्वक खेळ करण्याची गरज आहे.पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारताचा मोठा गाजावाजा झाला. परंतु आता दुसरी कसोटी गमावल्यानंतर विजयी लय यजमानांच्या बाजूने गेली आहे. आॅस्टेÑलिया घरच्या मैदानावर खेळत असल्याने गमावलेली लय भारताला महागात पडू शकते. सर्वांना चिंता होती की, आॅस्टेÑलियाच्या वेगवान माऱ्याला भारतीय कसे सामोरे जाणार. परंतु, सर्वांना चकित करताना नॅथन लियॉनने भारताची फिरकी घेतली. माझ्या मते तो महान फिरकीपटू आहे. त्यामुळे आता भारतासाठी वेगवान व फिरकी अशी दुहेरी आव्हाने आहेत.
भारताचा पराभव झाला, कारण फलंदाज अपयशी ठरले. भारताच्या अव्वल ७ फलंदाजांवर नजर टाकल्यास त्यांच्याकडे एकूण २५०हून अधिक सामन्यांचा अनुभव असल्याचे दिसून येईल. त्याउलट आॅस्टेÑलियाकडे तो अनुभव अर्धा आहे. शिवाय त्यांची फलंदाजी कमजोर असून आपली फलंदाजी मजबूत आहे. तरीही यजमान वरचढ ठरले. त्यामुळेच मी दोष देईन फलंदाजांच्या अपयशाला. जर भारताला विदेशात जिंकायचे असेल तर सातत्याने ३५०हून अधिक धावा कराव्याच लागतील.
(लेखक लोकमत वृत्त समुहात संपादकीय सल्लागार आहेत )