नवी दिल्ली : ‘रणजी चषक क्रिकेटच्या आयोजनाकडे डोळेझाक करणे किंवा त्याकडे जास्त न लक्ष देणे अधिक नुकसानकारक ठरेल. यामुळे भारतीय क्रिकेटचे कंबरडे मोडले जाईल,’ अशी प्रतिक्रिया भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली. बीसीसीआयने पुढील दोन महिन्यांपासून रणजी स्पर्धा दोन सत्रांमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या काहीवेळ आधीच शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली.
शास्त्री यांनी ट्वीट केले की, ‘रणजी चषक स्पर्धा भारतीय क्रिकेटचा कणा आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे कंबरडे मोडेल.’ शास्त्री यांच्या या ट्वीटनंतर एक तासाने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रणजी स्पर्धा दोन सत्रांमध्ये खेळविण्यात येणार असल्याची माहिती दिली. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी गुरुवारीच बोर्डाच्या बैठकीनंतर रणजी स्पर्धेचे आयोजन दोन सत्रांमध्ये होण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते.कोरोना महामारीदरम्यान बीसीसीआयने पुरुषांच्या विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली चषक या दोन स्पर्धांचेच आयोजन केले होते.
n बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले,‘ ‘बोर्डने रणजी स्पर्धा दोन सत्रांमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सत्रामध्ये साखळी सामने रंगतील आणि बाद फेरीचे सामने जूनमध्ये खेळविण्यात येतील. माझी टीम महामारीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे.’n रणजी चषक स्पर्धा आमची देशांतर्गत स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा आहे. या स्पर्धेतून भारताला दरवर्षी अनेक गुणवान खेळाडू लाभतात. या स्पर्धेच्या हितासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची काळजी घेण्यात येईल.’