कोलंबो, दि. 5- पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकणा-या श्रीलंकन फलंदाजांनी दुस-या डावात ब-यापैकी प्रतिकार केला आहे. तिस-या दिवस अखेर श्रीलंकेच्या दोन बाद 209 धावा झाल्या आहेत. श्रीलंकेचा संघ अजूनही 230 धावांनी पिछाडीवर आहे.
भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर सलामीवीर उपुल थरंगा (2) लगेच बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डावही अडचणीत येईल असे वाटत होते. पण करुणारत्ने आणि मेंडीसने श्रीलंकेचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी 191 धावांची भागीदारी केली. दुस-या डावात श्रीलंकेकडून कुसल मेंडीसने (110) शानदार शतक झळकवले. सलामीवर करुणारत्ने (92) धावांवर नाबाद आहे. दिवसअखेर हार्दिक पांडयाने ही जोडी फोडली. त्याने मेंडीसला वृद्धीमान सहाकरवी झेलबाद केले.
भारताने शुक्रवारी आपला पहिला डाव 9 बाद 622 धावांवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 183 धावात आटोपला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पुन्हा फलंदाजीला न उतरता श्रीलंकेला फॉलोऑन दिला. दुस-या डावातही श्रीलंकेचे फलंदाज नांगी टाकतील असे वाटले होते पण मेंडीस आणि करुणारत्नेने भारतीय गोलंदाज वरचढ ठरणार नाहीत याची काळजी घेतली.
तत्पूर्वी श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 183 धावात आटोपला. डीकवेलाचा (51) अपवाद वगळता श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर सपशेल नांगी टाकली. मॅथ्यूज आणि डिकवेलामध्ये पाचव्या विकेटसाठी झालेली 53 धावांची पार्टनरशिप श्रीलंकेच्या डावातील एकमेव मोठी भागादारी ठरली. अश्विन आणि जाडेजाने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवत श्रीलंकन फलंदाजीचा कंबरडे मोडले.
अश्विनने श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. अश्विनच्या फिरकीसमोर श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. करुणारत्ने (25), थरंगा (0), मॅथ्यूज (26), परेरा (25) आणि फर्नाडो (0) यांना अश्विनने टिपले. जाडेजा, शामीने प्रत्येकी दोन तर, उमेश यादवने एक विकेट घेऊन चांगली साथ दिली. भारताने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केला. शुक्रवारी 9 बाद 622 धावांवर पहिला डाव घोषित केला. दिवसअखेर 2 बाद 50 अशी अवस्था करुन श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले.
शनिवारी खेळाला सुरुवात झाल्यानंतर उमेश यादव आणि रविंद्र जाडेजाने मेंडीस आणि चंडीमलला परत पाठवत श्रीलंकेला धक्के दिले. यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि डिकवेलाने पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. मात्र रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने अँजलो मॅथ्यूजचा सुरेख झेल घेतला. ५ विकेट्सनंतर धनंजय डिसिल्वाला पहिल्याच चेंडूवर आउट करत रविंद्र जाडेजाने लंकेला सहावा धक्का दिला. श्रीलंकेकडून निरोशन डिकवेलाने एकाकी झुंज देत अर्धशतक केलं. पण भारताचा कॅप्टन विराट कोहलीने गोलंदाजीत परिवर्तन केल्यानंतर, मोहम्मद शमीने एकाच षटकात डिकवेला आणि रंगना हेरथला माघारी धाडले.