नवी दिल्ली : आयपीएल २०२२ चा श्रीगणेशा होण्यास आता दहा दिवस शिल्लक आहेत. सर्वच संघाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. खेळाडू सराव सत्रात घाम गाळत असून, बीसीसीआयदेखील १५ वे सत्र संस्मरणीय करण्यास कुठलीही कसर शिल्लक राखू इच्छित नाही.
खेळाडूंच्या सुरक्षेबाबत बीसीसीआयने बायो-बबलचे नियम कडक केले आहेत. आयपीएलदरम्यान कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास खेळाडूंवर कठोर कारवाई होईल. बीसीसीआयने मागच्या वर्षी झालेल्या चुकांपासून बोध घेतला. आयपीएल २०२१ ला तीन संघांनी बायो बबलचे उल्लंघन केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्यात आली होती. यंदा असे होणार नाही.
अशी असेल शिक्षा...
पहिला गुन्हा : सात दिवसांचे क्वारंटाईन किंवा आयपीएल २०२२ मध्ये आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलसाठी अमलात येणाऱ्या कालावधीसाठी बाहेर.
दुसरा गुन्हा : विनावेतन एका सामन्याचे निलंबन. सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खेळविण्याबाबत विचार होऊ शकेल.
तिसरा गुन्हा : उर्वरित पर्वासाठी संघातून हकालपट्टी.
कुटुंबीयांसाठीही दोन अटी
पहिल्या गुन्ह्यासाठी खेळाडूच्या कुटुंबातील महिलेलादेखील सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास उर्वरित पर्वासाठी संघ किंवा त्या खेळाडूच्या कुटुंबीयांना बायो-बबलमधून काढून टाकले जाईल. एखाद्या फ्रॅन्चायजीकडे १२ पेक्षा कमी खेळाडू उपलब्ध असतील आणि सामन्यासाठी मैदानावर संघ उतरविण्यास असमर्थ असतील तर प्लेईंग इलेव्हनमध्ये किमान सात भारतीय खेळाडू असायला हवेत. याशिवाय एक बदली क्षेत्ररक्षकही असायला हवा.
बीसीसीआय विशेष अधिकारांतर्गत सत्रातील सामन्यांचे पुन्हा आयोजन करण्याचा प्रयत्न करेल. असे न झाल्यास हा मुद्दा आयपीएलच्या तांत्रिक समितीकडे पाठविला जाईल. आयपीएल तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम असेल. कोरोना महामारी खेळाडूंच्या आरोग्यास घातक असल्यामुळे सुरक्षित वातावरणनिर्मितीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडू आणि अधिकाऱ्याचे सहकार्य, समर्पितवृत्ती आणि काटेकोर पालन करण्याची वृत्ती अपेक्षित आहे. - बीसीसीआय
Web Title: Follow the rules, otherwise strict action; BCCI's tough role for IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.