नवी दिल्ली : आयर्लंडपाठोपाठ नवख्या पापुआ न्यू गिनीच्या संघाने देखील आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. फिलीपीन्सचा पराभव करत पापुआ न्यू गिनीने ही किमया साधली. १०० धावांनी मोठा विजय मिळवत नवख्या संघाचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न साकार झाले. तसेच आयर्लंडने देखील ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. जर्मनीविरुद्धच्या वॉशआउटने आयर्लंडला ९ गुणांसह सात संघांच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून दिले.
आज झालेल्या सामन्यात फिलीपीन्सने नाणेफेक जिंकून पापुआ न्यू गिनीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनी संघाने सांघिक खेळी करत २० षटकांत २२९ धावांचा डोंगर उभारला. टोनी उरा (६१), कर्णधार असद वाला (५९), लेगा सिका (२६), चार्ल्स अमीनी (५३) आणि हिरी हिरीने (२०) धावा करून पापुआ न्यू गिनीची धावसंख्या २०० पार नेली.
पापुआ न्यू गिनीचा मोठा विजय
२३० धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना फिलीपीन्सच्या संघाला घाम फुटला. कर्णधार डेनिय स्मिथ (३४) वगळता एकाही फिलीपीन्सच्या फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पापुआ न्यू गिनीच्या गोलंदाजांनी देखील सांघिक खेळी करत प्रतिस्पर्धी संघाला २० षटकांत ७ बाद केवळ १२९ धावांत रोखले अन् पापुआ न्यू गिनीने तब्बल १०० धावांनी मोठा विजय साकारला. या विजयासह नवख्या संघाने ट्वेंटी-२० विश्वचषकाचे तिकिट मिळवले आहे. लक्षणीय बाब म्हणजे केवळ ११,७८१,५५९ एवढी लोकसंख्या असलेला देश विश्वचषक खेळणार आहे.
विश्वचषकासाठी १२ संघ आधीच 'पास'
वेस्ट इंडिज आणि अमेरिका इथे आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी एकूण २० संघ रिंगणात आहेत. पहिल्या फेरीसाठी संघांची प्रत्येकी पाचच्या चार गटात विभागणी केली जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-८ साठी पात्र ठरतील. सुपर-८ मधील संघांना प्रत्येकी चारच्या दोन गटात विभागले जाईल आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. दरम्यान, पात्रता फेरीच्या सामन्यांपूर्वीच १२ संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. यजमान वेस्ट इंडिज आणि यूएसए या संघांशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलॅंड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगानिस्तान आणि बांगलादेश हे संघ पात्र ठरले आहेत.
Web Title: Following Ireland, Papua New Guinea also qualified for the ICC Men's T20 World Cup 2024 after defeating the Philippines by 100 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.