इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचा पहिला टप्पा स्थगित करण्यात आला होता अन् उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयनं जाहीर केला. आयपीएल २०२१चे उर्वरित सामने यूएईत होणार असल्याची घोषणा बीसीसीआयनं केली आहे, परंतु त्यांच्या मार्गात अनेक अडथळे होते. त्यापैकी एक म्हणजे वेस्ट इंडिज खेळाडूंच्या उपलब्धतेचा. कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( Caribbean Premier League ) वेळापत्रकामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली होती, परंतु आता त्यांचा हा अडथळा दूर झाला आहे.
क्रिकेट वेस्ट इंडिजनं CPL 2021च्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या विंडीज खेळाडूंना सर्व सामने खेळता येणार आहेत. मागील महिन्यात क्रिकेट वेस्ट इंडिजनं CPL 2021चं वेळापत्रक जाहीर केलं आणि त्यानुसार २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार होती. पण, बीसीसीआयनं विनंती केल्यानंतर त्यात बदल झाला असून आता २६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत CPL 2021 होणार आहे. त्यामुळे ख्रिस गेल, आंद्रे रसेल, किरॉन पोलार्ड सारखे विंडीजचे स्टार आणि दक्षिण आफ्रिकेचे ख्रिस मॉरिस, फॅफ ड्यू प्लेसिस व अॅनरिच नॉर्ट्झे हे खेळाडू आयपीएलसाठी यूएईत वेळेत दाखल होऊ शकणार आहेत.
''आयपीएल आणि सीपीएल या दोन्ही स्पर्धा क्रिकेट वेस्ट इंडिज, आमचे खेळाडू आणि फॅन्ससाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या दोघांच्या तारखा एकमेकांत व्यत्यय आणणार नाहीत, अशी क्रिकेट वेस्ट इंडिजची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही CPLच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे,''असे क्रिकेट वेस्ट इंडिजचे प्रेसिडंट रिकी स्केरीट यांनी सांगितले. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबर पासून सुरूवात होणार असल्याचे बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी जाहीर केले होते.