लाहोर : वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीला हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. मर्यादित षटकांच्या सामन्यांत कर्णधारपद रोहित शर्माकडे द्यावे, तर कोहलीकडे कसोटीचे नेतृत्वा द्यावे, असा विचार बीसीसीआय करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण, तुर्तास तरी बीसीसीआयनं कोहलीवरच विश्वास दाखवला आहे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात तीनही संघाचे नेतृत्व कोहलीकडेच ठेवण्यात आले आहे. कोहलीली कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी म्हणजे, मूर्खपणा असल्याचे मत पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले.
तो म्हणाला,''गेली 3-4 वर्ष कोहली टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि इतकी वर्ष त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवल्यानंतर आता त्याला पदावरून काढणे चुकीचे ठरेल. त्याला एक उत्तम मार्गदर्शक हवा, उत्तम निवड समिती असावी आणि त्यानंतर तो अधिक सर्वोत्तम कर्णधार बनेल. रोहित हा चांगला कर्णधार आहे, याबाबत शंका नाही. त्यानं आयपीएलमध्ये नेतृत्व कौशल्य दाखवले आहे. पण, कर्णधारपदासाठी कोहलीत गुंतवणुक करणे योग्य पर्याय ठरेल. कर्णधारपदासाठी कोहली हा संमजस निवड आहे. त्यामुळे त्याला हटवण्याची मागणी मुर्खपणाची आहे.''
टीम इंडियातील दुफळीवर प्रथमच कॅप्टन कोहलीनं मांडलं मत, म्हणाला...भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. यानंतर या विषयावर विराट काय बोलणार तसेच पत्रकारांना या विषयावरची योग्य ती उत्तरे देणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार होते.
त्यावर कोहली म्हणाला,'' मी पण खूप काही ऐकले आहे. पण, संघात तसं काहीच नाही. जर ड्रेसिंग रुमचे वातावरणं चांगले नसते तर मागील दोन वर्षांत संघाची कामगिरीचा आलेख चढा राहिला नसता. त्यामुळे संघात वाद नाही. ऑल इज वेल... अशा चर्चा येणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा चर्चा होणे दुर्दैवी आहे. ड्रेसिंग रुमचं वातावरणं कसं आहे हे तुम्ही स्वतः येऊ पाहा. कुलदीप यादव असो किंवा महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबतचे संबंध किती खेळीमेळीचे आहे, हे तुम्ही पाहा.''