India tour of Bangladesh 2022 । नवी दिल्ली : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक गुरूवारी जाहीर केले. या दौऱ्याची सुरुवात ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 4, 7 आणि 10 डिसेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांनी होईल. एकदिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ यजमान संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान चटगाव येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर आणि त्यानंतर ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना पार पडेल. तर दौरा संपल्यानंतर 27 डिसेंबर रोजी भारतीय संघ मायदेशी येण्यासाठी रवाना होईल.
2015 नंतर प्रथमच भारताचा बांगलादेश दौरा
लक्षणीय बाब म्हणजे बांगलादेशच्या धरतीवर होणारे दोन्हीही कसोटी सामने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळी सामन्यांचा हिस्सा असतील. या क्रमवारीत भारतीय संघ 52.08 टक्के गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर यजमान बांगलादेशचा संघ 13.33 टक्के गुणांसह चॅम्पियनशिप क्रमवारीत एकदम तळाशी आहे. खरं तर 2015 नंतर प्रथमच भारत बांगलादेश दौऱ्यावर जात आहे. शेवटच्या वेळी 2015 मध्ये झालेल्या दौऱ्यात फक्त एक कसोटी सामना खेळवला गेला जो अनिर्णीत ठरला. तर बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत 2-1 ने बाजी मारली होती.
बीसीसीआयचे मानले आभार
एका अधिकृत निवेदनात बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी डिसेंबरमध्ये दोन्ही संघांमधील मोठ्या स्वरूपातील सामने होण्याच्या शक्यतेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, "बांगलादेश आणि भारत यांच्यामधील सामन्यांनी अलीकडच्या काळात आपल्याला काही मोठे सामने दिले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे चाहते आणखी एका मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. वेळापत्रक निश्चित करण्यासाठी BCB सोबत काम केल्याबद्दल मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) आभार मानतो. आम्ही भारतीय संघाचे बांगलादेशात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत."
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देखील आगामी मालिकेबद्दल भाष्य केले. "भारतासोबत होणाऱ्या आगामी द्विपक्षीय मालिकेसाठी मी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला माझ्या शुभेच्छा देतो. भारत-बांगलादेश स्पर्धा चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत असते, जी दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची उत्तम संधी असेल." असे जय शाह यांनी म्हटले.
भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक
- 1 डिसेंबर - भारतीय संघ बांगलादेशला पोहचेल
- 4 डिसेंबर - पहिला एकदिवसीय सामना, ढाका
- 7 डिसेंबर - दुसरा एकदिवसीय सामना, ढाका
- 10 डिसेंबर - तिसरा एकदिवसीय सामना, ढाका
- 14-18 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
- 22-26 डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका
- 27 डिसेंबर - भारतीय संघ मायदेशी परतण्यासाठी रवाना होईल
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: For the first time since 2015, the Indian team will tour Bangladesh for ODI and Test series, know the complete schedule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.