इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला काही खास कामगिरी करता आली नाही. अपघातामुळे रिषभ पंत आयपीएल २०२३ खेळू शकला नाही आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. DC ला मार्गदर्शन करणाऱ्या फळीत सौरव गांगुली, रिकी पाँटिंग, शेन वॉटसन, अजित आगरकर हे दिग्गज खेळाडू होते, पण अपयशाने संघाची पाठ काही सोडली नाही. त्यामुळे IPL 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात खांदेपालट पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यात संघ मालक पार्थ जिंदाल यांच्या ट्विटने स्पष्ट संकेत दिले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटने रिकी पाँटिंग याला मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्याचवेळी सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन याला दूर केले जाणार असल्याचे वृत्त आहे. पुढील पर्वात DC च्या सपोर्ट स्टाफमध्ये वॉटसन व जेम्स होप्स ( जलदगती गोलंदाज प्रशिक्षक) दिसणार नसल्याचे वृत्त TOI ने दिले आहे. जिंदाल यांनी ट्विट केले की,'' सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग यांच्यासह पुढील आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सने तयारीला सुरुवात केली आहे. संघाला पुढच्या वर्षी अव्वल स्थानावर आणण्यासाठी मी आणि किरण ( सहमालक) यांनी कंबर कसली आहे.