RCB vs PBKS । मोहाली : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील २७वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात खेळवला जात आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात होत असलेल्या सामन्यात यजमान पंजाबचा संघ बंगळुरूच्या भिडूंशी भिडत आहे. दोन्हीही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा असणार आहे. पंजाबचा संघ आपला मागील सामना जिंकून इथे आला आहे, तर विराट आर्मीला त्यांच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबी विजयाच्या रूळावर परतणार का हे पाहण्याजोगे असेल.
दरम्यान, पंजाब किंग्जच्या संघाने ५ सामन्यांतील ३ सामने जिंकले असून २ सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. तर बंगळुरूच्या संघाला ५ सामन्यांतील केवळ २ सामन्यात विजय मिळाला असून ३ सामने गमवावे लागले आहेत. आजच्या सामन्यात देखील पंजाब किंग्जच्या संघाचे नेतृत्व सॅम करन करत आहेत. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षणीय बाब म्हणजे आज विराट कोहली आरसीबीच्या संघाचे नेतृत्व करत आहे. आरसीबीचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस आज इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात खेळणार असून त्याच्या जागी वैशाख विजय कुमारला संधी मिळाली आहे. तब्बल ५५६ दिवसांनंतर विराट कोहली आरसीबीचे नेतृत्व करत आहे.
शिखर धवनच्या गैरहजेरीत सॅम करनच्या नेतृत्वात पंजाबने आपल्या शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला होता. खरं तर आम्हालाही प्रथम फलंदाजीच करायची होती असे कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक गमावल्यानंतर सांगितले. विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधार असल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"