- सुकृत करंदीकर
केट हा खेळ मुळात साहेबांचा. इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळलं जात असल्याचा पहिला संदर्भ १६११ चा आहे. त्यानंतरच्या काळात पूर्वेची न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया बेटं, पश्चिमेची कॅरेबियन बेटं, आशिया-आफ्रिका असं जिथं-जिथं ब्रिटिश गेले तिथं त्यांनी क्रिकेट नेलं. राज्यकर्त्यांच्या खेळाची चटक त्यांच्या गुलामांनाही लागली. जेमतेम बारा देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कायम सदस्य आहेत. भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज. अफगाणिस्तानचा अपवाद वगळता बाकी सगळे देश ब्रिटिशांनी कधी ना कधी सत्ता गाजवलेले. क्रिकेट प्रसाराचा भाग म्हणून इतर ९४ देशांना सहयोगी सदस्यत्व देण्यात आलं आहे.
नामिबियाला आयसीसीचं सहयोगी सदस्यत्व १९९२ मध्ये बहाल करण्यात आलं. पहिल्या महायुद्धापूर्वी इथं जर्मन लोकांची वसाहत होती. इंग्रजांच्या शेजारामुळं या वसाहतीत क्रिकेट सुरु झालं होतं. पहिल्या महायुद्धात जर्मनांचा पराभव होत असताना शेजारच्या दक्षिण आफ्रिकेनं म्हणजे एका अर्थानं ब्रिटिशांनी नामिबियावर वर्चस्व मिळवलं. त्यानंतर इथल्या क्रिकेटला जोम आला. ब्रिटिशांच्या जगभरच्या वसाहतींमध्ये जे झालं तेच इथंही घडलं. प्रारंभी क्रिकेट ब्रिटिश आणि त्यांचे मांडलिक अमीर-उमरावांपुरतं मर्यादित होतं. मैदान, खेळपट्टी तयार करणं, क्रिकेट साहित्याची ओझी वाहणं, खेळाडू आणि त्यांच्या मडमा, स्त्रिया, पोरंसोरं यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, साहेब किंवा अमिर-उमराव कंटाळेपर्यंत त्यांना गोलंदाजी करणं, त्यांनी फटकावलेले दूरवरचे चेंडू पळत जाऊन घेऊन येणं असली कामं स्थानिक नोकरचाकरांना करावी लागत.
ब्रिटिशांच्या काळात एत्तदेशीयांची क्रिकेट खेळण्याची सुुरुवातच खरं म्हणजे क्षेत्ररक्षणापासून सुरू झाली. गोरे आणि काळे इंग्रज तासनतास खेळतात तरी काय, हे पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून स्थानिक लोक जमू लागले. यातून स्थानिकांना क्रिकेटनं गोडी लावली. एक संघ विरुद्ध दुसरा संघ अशा स्पर्धा सुुरु झाल्यानंतर स्थानिकांनाही फलंदाजीची संधी मिळू लागली. ब्रिटिश, त्यांचे मांडलिक अमीर-उमराव आणि एत्तदेशीय सर्वसामान्य यांच्यातील दरी क्रिकेटनं काही अंशी बुजवली. जात, धर्म, भाषा, प्रांत, मालक-गुलाम असली बंधनं कला-क्रीडेला वेसन घालू शकत नाहीत. साहेबांचा खेळ सामान्यांपर्यंत झिरपला.
नामिबिया यात होता. गेल्या जवळपास शंभर वर्षांपासून नामिबियात क्रिकेट खेळलं जात आहे. मात्र १९७५ पासून बारा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा झाल्या. यातल्या २००३ च्या एकाच स्पर्धेसाठी नामिबिया पात्र होऊ शकला. त्यातही पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, झिम्बाब्वे या सगळ्यांनी मोठ्या फरकानं नामिबियाला नेस्तनाबूत केलं. एवढंच काय, पण त्यांच्यासोबतच हा विश्वचषक पहिल्यांदाच खेळणाऱ्या नेदरलँडनेही नामिबियाला हरवलं. नामवंत संघांसमोर नामिबियाला अजून तरी लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. युगांडा, केनिया, झिम्बाब्वे, घाना अशा आफ्रिकी देशांना, नेपाळ, बर्मुडा, स्कॉटलंडसारख्या अन्य काही देशांना मात्र त्यांनी नमवलं आहे. २००७ पासूनच्या सहा टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धांसाठीही नामिबिया पात्र ठरला नाही. ती संधी त्यांनी यंदा मिळवली. अर्थात ते फार मजल मारतील अशी शक्यता किंचितही नाही.
भारताच्या कृपेनं क्रिकेट आणि आयसीसी खूप श्रीमंत झालं आहे. आफ्रिका-आशियातील अनेक गरीब देश क्रिकेटकडे वळण्यामागं क्रिकेटमधला पैसा हे प्रमुख कारण आहे. ‘आयपीएल’सारख्या एखाद-दुसऱ्या स्पर्धेत संधी मिळाली तरी मिळणारं मानधन आणि प्रसिद्धी एखाद्याचं आयुष्य घडवून जाते. मात्र अजूनही आफ्रिकेतल्या तरुणांची पहिली पसंती फुटबॉल आणि ॲथलेटिक्सला आहे. या दोन्ही क्रीडा प्रकारात तुमच्या तंदुरुस्ती आणि कौशल्याचा कस लागतो. तुलनेत क्रिकेट फार सोपं आहे. त्यामुळं आफ्रिकेतल्या उंच्यापुऱ्या, तगड्या तरुणांना तिकडं जमलं नाही तर, ‘करिअर ऑप्शन’ म्हणून क्रिकेट जवळचं वाटतं. म्हणून बहुतेक आफ्रिकी देश ‘आयसीसी’चे सहयोगी सदस्य बनले आहेत. ऑस्ट्रेलियाला जसं ‘कांगारू’, बांग्लादेशला ‘टायगर्स’ किंवा न्यूझीलंडला ‘किवी’ नावानं ओळखतात तसं नामिबियाला ‘ईगल्स’ म्हणतात. पण, गेली शंभर वर्षं या ‘गरुडा’ची पावलं चिमुकलीच राहिली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विश्वातल्या ताकदवानांपुढं गरुडभरारी घेण्यासाठी नामिबियाला पंखात प्रचंड ताकद भरून घ्यावी लागेल.