Corona Virus मुळे इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल 2020) सामने होणार की नाही? झालेच तर ते बंद स्टेडिमयवर होतील का? तसे झाल्यास आपल्या फेव्हरिट क्रिकेटपटूचा याचि देही याचि डोळा पाहता येणार नाही, मग काय मजा? रोहित शर्मा, हार्दिक पांड्याचे षटकार कसे पाहता येणार? आयपीएलच झाले नाही तर महेंद्रसिंग धोनीचे टीम इंडियातील पुनरागमन कसे होणार? आदी अनेक प्रश्न सध्या सामान्य क्रिकेटप्रेमीच्या डोक्यात बॅटींग करत आहेत. कोरोना विषाणूंमुळे जगभरात ४०११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे, पण आम्हाला आयपीएल होणार की नाही हीच चिंता सतावत आहे.
कोरोना विषाणूंमुळे चीनमध्ये मंगळवारी आणखी १७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे चीनमधील बळींची संख्या आता ३१३६ झाली आहे. या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत ४०११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १०० हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूची लागण आतापर्यंत एक लाख १० हजार नागरिकांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, क्रिकेटवेड्या भारतात सध्या एकच चर्चा आहे. आयपीएल होणार की नाही. कोरोना विषाणू पसरण्यापासून रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणं टाळा, अशा सुचना वारंवार केल्या जात आहेत. क्रिकेटच्या एका सामन्याला ४० ते ५० हजार लोकं एका ठिकाणी जमतात आणि अशात कोरोना विषाणू सहज पसरू शकतो.
जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात FIFA ने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २०२२च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सर्व सामने तुर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश प्रीमिअर लीग ( इपीएल), ला लिगा ( स्पॅनिश लीग), सिरी ए ( इटालियन लीग ) अशा जगभरात सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असलेल्या फुटबॉल लीगनी त्यांचे सामने बंद स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या काही संघ मालकांनीही सामने बंद स्टेडियममध्ये खेळवण्यात यावे, अशी विनंती केली आहे. पण, आयपीएल रद्द करू नका, असा त्यांचा अट्टाहास आहे. बीसीसीआयनं बंद स्टेडियमवर सामने खेळवण्याचा प्रस्तावही फेटाळला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की,''बंद दरवाजात सामने खेळवणे हा काही पर्याय नाही. इंडियन सुपर लीगमधील अॅटलेटीको कोलकाता आणि बंगळुरु एफसी यांच्यातील प्ले ऑफ लढतीत ६० हजार प्रेक्षक उपस्थित होते. त्यानं कोणाला काही झाले का? मग प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्यापासून का रोखायचे?'' असा उलट सवाल बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आला. यावरून चित्र स्पष्ट आहे की आयपीएल खेळवायची आणि तिही प्रेक्षकांच्या उपस्थितीत... बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आयपीएल नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, हे स्पष्ट केले आहेच.
एखाद्या वर्षी आयपीएल खेळवली नाही, तर असं कोणतं संकट ओढावणार आहे? आयपीएलच्या एका मोसमातून कोट्यवधी महसूल मिळतो. त्यामुळे लोकांचे जीव गेले तरी चालतील, पण पैसा आलाच पाहिजे... त्यामुळेच म्हणतोय Corona वगैरे विसरा... क्रिकेट अन् आयपीएलचा आनंद लुटा... BCCI ची तिजोरी भरा!
कर्नाटकने उचललेले पाऊल अन्य राज्य उचलतील का?कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारने आयपीएल रद्द करावी अशी विनंती करणारे पत्र केंद्र सरकारकडे पाठवल्याचे वृत्त स्थानिक चॅनलने काल दिवसभर चालवले. शिवाय त्यांनी लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयपीएलचे सामने आयोजन करण्यास मनाई केल्याचेही वृत्त समोर येत आहे. कर्नाटक हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचे घरचे मैदान आहे. बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB त्यांचे घरचे सामने खेळते. कर्नाटक राज्य सरकारसारखा निर्णय अन्य राज्य सरकार घेतील का?
भारत-दक्षिण आफ्रिका रद्द करता आली असती, पण...कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारी तीन वन डे सामन्यांची मालिका रद्द करता आली असती. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी आफ्रिकेचे खेळाडू कोणाशी हस्तांदोलन करणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या वैद्यकिय टीमनं दिली. पण, एवढीच काळजी होती, तर भारत दौऱ्यावर आम्ही येत नाही, असेही त्यांना बीसीसीआयला कळवता आले असते. मग हस्तांदोलन करण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. पण, येथेही पैसाच महत्त्वाचा ठरला.
मराहाष्ट्र राज्य सरकारची दुटप्पी भूमिका?कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजनेसाठी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यात आयपीएल स्पर्धा महाराष्ट्रात होऊ द्यायची की नाही, हाहा मुद्दा चर्चिला जाण्याची शक्यता आहे. आयपीएल पुढे ढकलायची की नाही याबाबत महाराष्ट्र सरकार विचार करत असल्याची माहिती, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मागील आठवड्यात दिली होती. राजेश टोपे म्हणाले होते की,''मोठ्या संख्येनं लोकं जिथे जमतात तेथे कोरोना व्हायरससारख्या संक्रामक रोगचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. अशा स्पर्धा नंतरही आयोजित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आयपीएल पुढे ढकलावी की नाही, यावर चर्चा सुरू आहे.''