ॲडिलेड : भारताविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीआधी वचपा काढण्याच्या योजनेविषयी विचार करण्यास माझ्याकडे वेळ नसल्याचे सांगून ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने पहिली कसोटी गमविणाऱ्या भारतीय संघाला त्याने खचून न जाता पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स या वेगवान त्रिकुटाने अलीकडे सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत भारताला ३६ धावात गारद केले होते. यजमानांनी पहिला सामना आठ गडी राखून जिंकल्यानंतर २६ डिसेंबरपासून मेलबोर्न मैदानावर दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल.सोनी नेटवर्कच्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना स्टीव्ह म्हणाला, ‘त्या दिवशी आम्ही अतिशय दर्जेदार वेगवान मारा अनुभवला. माझ्या मते, मागच्या पाच वर्षांत आमच्या वेगवान गोलंदाजांची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी असावी. सर्वजण शानदार वेग आणि अचूक टप्पा राखून मारा करीत होते. अशावेळी कधी चेंडू बॅटला चाटून जातो आणि क्षेत्ररक्षक अलगद झेल टिपतो. स्वत:ला सकारात्मक मानसिकता राखून पुढे जायला हवे.’ मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाल्याने तो मालिकेतून बाहेर पडला तर कर्णधार विराट कोहली हा पितृत्व रजेवर मायदेशी परतला आहे, यावर स्मिथ म्हणाला, ‘मी भारताबाबत अधिक विचार करीत नाही. आमच्यादृष्टीने महत्त्वाचे हेच की आम्ही योग्य दिशेने जात आहोत का. शमीच्या अनुपस्थितीतही भारताकडे नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज हे प्रतिभावान गोलंदाज आहेत.’
दारुण पराभवानंतर भारताच्या मानसिकतेविषयी तुला काय वाटते, असा प्रश्न स्मिथला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, ‘प्रत्येक खेळाडू वेगळा असतो. बाद होण्याची पद्धत कशी होती याचा विचार करण्याची त्यांची पद्धतही वेगळी असते. तथापि मागचा विचार सोडून पुढे काय करता येईल याचा सकारात्मकतेने विचार करायला हवा.’