वेलिंग्टन : ‘टी-२० विश्वचषकातील दारुण पराभवामुळे आमच्यासह सर्व चाहते निराश असल्याची मला जाणीव आहे. पण आम्ही व्यावसायिक खेळाडू असल्याने जे झाले ते विसरून पुढे वाटचाल करावी लागेल,’ अशा शब्दांत टीम इंडियाचा हंगामी कर्णधार हार्दिक पांड्या याने न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरू होण्याआधी सहकारी खेळाडूंना धीर दिला आहे.
हार्दिक बुधवारी म्हणाला, ‘२०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या रोडमॅपची (आराखडा) तयारी सुरू झाली. अनेक खेळाडूंना संघातील स्थान निश्चित करण्यासाठी संधी दिली जाईल. आपल्या चुकांपासून बोध घ्यावा लागेल.’ पुढचा टी-२० विश्वचषक २०२४ ला वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित होईल. तोपर्यंत विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंची निवृत्तीदेखील शक्य आहे.
या पार्श्वभूमीवर हार्दिकने मत मांडले. तो पुढे म्हणाला,‘पुढच्या विश्वचषकासाठी आणखी दोन वर्षे आहेत. आमच्याकडेही गुणवत्तेचा शोध घेण्यास वेळ असेल. बरेच क्रिकेट खेळले जाईल आणि अनेकांना संधीही मिळेल. आराखडा आखण्यास सुरूवात झाली असली तरी अंतिम निर्णयावर येणे अतिघाईचे ठरेल. त्यासाठी बरेच मंथन केले जाणार आहे. सध्या मात्र खेळाडूंनी येथे खेळण्याचा आनंद लुटावा, भविष्याचा विचार नंतर करू.’ न्यूझीलंड दौऱ्यात तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जातील. विराट, रोहित, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन यांना कार्यभार व्यवस्थापनाअंतर्गत मालिकेतून विश्रांती देण्यात आली.
‘वरिष्ठ खेळाडू संघात नसले तरी ज्यांची निवड झाली ते दीड-दोन वर्षांपासून खेळत आहेत. त्यांना अनेक संधी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय क्षीतिजावर सर्वांनी स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली आहे. नवे खेळाडू, नवी ऊर्जा, नवा रोमांच पाहण्यास मी फारच उत्सुक आहे. अनेकांच्या दृष्टीने ही मालिका मोलाची असेल. येथे चांगला खेळ केल्यास ते पुढील निवडीसाठी दावेदार असतील,’ असे हार्दिकने स्पष्ट केले.
‘काही सिद्ध करण्याची गरज नाही’ भारताच्या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने आपल्या स्तंभात लिहिले होते की, भारताने २०११ चा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकल्यापासून नवे काहीही हस्तगत केले नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात हा संघ नेहमी अपयशीच ठरला आहे. याविषयी विचारताच पांड्या म्हणाला,‘माझ्या मते आम्हाला काही सिद्ध करण्याची गरज असेल असे वाटत नाही. खराब खेळल्यास लोक टीका करतीलच, पण आम्ही त्यांचा सन्मान करतो.’