अजब गजब हॅट्ट्रिक, लागोपाठ झेल सोडण्याची ! मुंबई इंडियन्सचा किरेन पोलार्ड 'वन अँड ओन्ली' 

अॉस्ट्रेलियात मिचेल स्टार्कच्या एकाच सामन्यातील दोन हॅट्ट्रिकमुळे क्रिकेटमधील वेगवेगळ्या हॅट्ट्रिक्सची चर्चा होतेय. त्यात एक अजब- गजब हॅट्ट्रिक दिसून आलीय ती म्हणजे लागोपाठ झेल सोडण्याची.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 01:27 PM2017-11-09T13:27:31+5:302017-11-09T13:31:35+5:30

whatsapp join usJoin us
A forgettable 'hat-trick' for Kieron Pollard | अजब गजब हॅट्ट्रिक, लागोपाठ झेल सोडण्याची ! मुंबई इंडियन्सचा किरेन पोलार्ड 'वन अँड ओन्ली' 

अजब गजब हॅट्ट्रिक, लागोपाठ झेल सोडण्याची ! मुंबई इंडियन्सचा किरेन पोलार्ड 'वन अँड ओन्ली' 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ललित झांबरे/जळगाव - अॉस्ट्रेलियात मिचेल स्टार्कच्या एकाच सामन्यातील दोन हॅट्ट्रिकमुळे क्रिकेटमधील वेगवेगळ्या हॅट्ट्रिक्सची चर्चा होतेय. त्यात एक अजब- गजब हॅट्ट्रिक दिसून आलीय ती म्हणजे लागोपाठ झेल सोडण्याची. सहसा गोलंदाजाने लागोपाठ तीन विकेट काढल्या की हॅट्ट्रिक असे आपण म्हणतो पण जर एखादा क्षेत्ररक्षक लागोपाठ तीन-तीन झेल सोडत असेल तर तीदेखील  हॅट्ट्रिकची म्हणावी लागेल ना आणि अशी अफलातून हॅट्ट्रिक आहे किरेन पोलार्डच्या नावावर.

वेस्ट इंडिज आणि मुंबई इंडियन्सचा किरेन पोलार्ड याच्या नावावर वेगळीच हॅट्ट्रिक जमा आहे. ती म्हणजे लागोपाठ तीन चेंडूंवर एकाच फलंदाजाचा झेल सोडण्याची. ही अचाट करणारी हॅट्ट्रिक झाली आयपीएलच्या 2013 च्या सत्रात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 5 मे 2013 रोजीच्या या सामन्यातील पहिल्याच षटकात पोलार्डने पॉईंटच्या जागी क्षेत्ररक्षण करताना ही हॅट्ट्रिक केली. सुदैवी फलंदाज होता माईक हसी आणि दुर्देवी गोलंदाज होता मिचेल जॉन्सन. योगायोगाने दोघेही अॉस्ट्रेलियन!  

आणखी एक योगायोग म्हणजे  हसीने तिन्ही वेळा आखूड आणि वाईड मिळालेला चेंडू सारखाच खेळत पॉईंटकडे कट करण्याचा प्रयत्न केला होता.  त्यात सामन्याच्या चौथ्या चेंडूवर हसीला पहिल्यांदा जीवदान तर मिळालेच शिवाय चौकारसुद्धा मिळाला. यावेळचा त्याचा झेल काहीसा कठीण होता पण पाचव्या आणि सहाव्या चेंडूवरचे झेल सोपे होते. तेसुध्दा  पोलार्डला टिपता आले नाही. यापैकी शेवटच्या प्रयत्नावेळी चेंडू उसळून पोलार्डच्या गालावर लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते.

हसीने लागोपाठ तीन जीवदानानंतरही फक्त 22 धावा केल्या. तर त्याच सामन्यात पुढे पोलार्डने सुरेश रैना (0)  व एम. एस. धोनीचे (10) झेल घेतले. यापैकी रैनाची विकेट जॉन्सनची होते आणि  त्यायोगे पोलार्डने आपल्या सोडलेल्या झेलांची काहीअंशी भरपाई जॉन्सनला करुन दिली. गंमत म्हणजे जिथे आधी तीन तीन झेल लागोपाठ सोडले त्याच पॉईंटच्या जागी पोलार्डने हा झेल घेतला. 

मुंबईने सीएसकेला 79 धावात गुंडाळत 60 धावांच्या फरकाने तो सामना जिंकला त्यामुळे पोलार्डच्या नावाने फारशी बोंबाबोंब झाली नाही. योगायोगाने मिचेल जॉन्सनच सामनावीर ठरला. पोलार्डमुळे तीन वेळा विकेट हुकल्यावरसुध्दा त्याने 27 धावात 3 विकेट घेतल्या. मात्र एमआयच्या विजयाचे बरेचसे श्रेय पोलार्डने नंतर रैना व धोनीसारख्या धोकादायक फलंदाजांच्या घेतलेल्या झेलांनासुद्धा दिले गेले.

पोलार्डच्या या हॅट्ट्रिकसारखी दुसरी हॅट्ट्रिक क्रिकेट इतिहासात नाही. मात्र भारतीय संघानेच एकदा लागोपाठ तीन झेल सोडण्याचा अवांछनीय विक्रम केला आहे. सामना होता हरारे येथील भारत आणि झिम्बाब्वेदरम्यानची दुसरी कसोटी. दिवस होता 22 सप्टेंबर 2005 आणि  दुर्देवी गोलंदाज होता झहीर खान तर नशिबवान फलंदाज होता अँडी ब्लिग्नौट. मात्र यावेळी झेल सोडणारा एकच क्षेत्ररक्षक नव्हता तर स्लीपमधील क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक होते.  झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावातील 32 व्या षटकाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर हे झेल सुटले होते. त्यात ब्लिग्नौटला पाचव्या चेंडूवर दोन धावांचा लाभही झाला होता. सुदैवाने हे सुटलेले झेल महागात न पडता भारताने 10 विकेट राखून हा सामना जिंकला होता.
 

Web Title: A forgettable 'hat-trick' for Kieron Pollard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.