भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहली धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी त्याचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे, असे रोखठोक मत बीसीसीआय निवड समितीचे माजी मुख्य अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहलीनं फक्त ८८ धावा केल्या. ज्यात ७० धावांच्या खेळीचाही समावेश आहे. भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका ०-२ अशी गमावली आहे. आता यातून सावरून टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मोठं आव्हान परतवून लावायचं आहे.
ऑस्ट्रेलिया दौरा टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा, कारण
न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला या दौऱ्यावर दमदार कामगिरी करून दाखवावी लागेल.
यावेळी विराट-पुजारा यांच्यातील सुरेख कॉम्बिनेशन दिसणार नाही
एमएसके प्रसाद यांनी स्टार स्पोर्ट्सवरील 'फॉलो द ब्लूज' या खास शोमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघासमोर काय आव्हान असेल यावर भाष्य केले. ते म्हणाले की, जर तुम्ही २०१८ मधील मालिकेतील टीम इंडियाची कामगिरी पाहिली तर एका बाजूला विराट कोहलीची आक्रमकता आणि दुसऱ्या बाजूला पुजाराचा संयम असं सुरेख कॉम्बिनेशन पाहायला मिळाले होते. यावेळी दोघांच कॉम्बिनेशन आपण मिस करु. कोहलीनं २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४०.२८ च्या सरासरीनं २८२ धावा काढल्या होत्या. दुसऱ्या बाजूला पुजारानं ७४.४२ च्या सरासरीनं ५२१ धावा केल्या होत्या. २०२३ पासून पुजारा टीम इंडियाबाहेर आहे.
कोहलीचा खराब फॉर्म चिंतेचा विषय, पण...
विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म हा आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टिने चिंतेचा विषय आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवात कशी करतो त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. विराट कोहलीला भारतीय मैदानात धावा करण्यात अपयश आले असले तरी तगड्या संघाविरुद्ध मोठ्या स्पर्धेत धावा काढण्यात माहीर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही तो चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.