Brett Lee । नवी दिल्ली : वन डे विश्वचषक 2023 च्या तयारीत गुंतलेल्या भारतीय संघाला आपल्या घरातच 3 सामन्यांची मालिका गमवावी लागली. ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चेन्नई येथे बुधवारी खेळल्या गेलेल्या 3 वन डे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. भारताच्या पराभवानंतर खेळाडूंसह कर्णधार रोहित शर्मावरही निशाणा साधला जात आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने देखील भारतीय संघ व्यवस्थापनासह रोहित शर्माला फटकारले आहे. भारतात प्रतिभेची कमतरता नाही. भारताकडे सर्वात धोकादायक गोलंदाज आहे, पण कर्णधार त्याला ओळखू शकत नाही, असे ब्रेट लीने म्हटले आहे. भारताकडे उमरान मलिकच्या रूपाने सर्वात धोकादायक गोलंदाज असल्याचे ब्रेट लीने म्हटले आहे. उमरानला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये संधी मिळायला हवी. उमरान हा उत्तम गोलंदाज आहे. त्याच्यात एक विशेष प्रतिभा आहे. उमरानचा वापर योग्य पद्धतीने केला तर तो त्याचे सर्वोत्तम देऊ शकतो. मला वाटते की मलिक तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू शकतो, असे ब्रेट लीने अधिक सांगितले.
श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध चमकदार कामगिरीभारत-ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेपूर्वी उमरान मलिकला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वारंवार संधी देण्यात आल्या होत्या. मलिकने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धही चमकदार कामगिरी केली, पण असे असतानाही मलिकला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. लक्षणीय बाब म्हणजे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या फॉर्ममुळे उमरान मलिकला खेळवणे कठीण असल्याचे कर्णधार रोहितने सांगितले होते.
ब्रेट लीचा मलिकला सल्ला ब्रेट ली पुढे म्हणाला की, उमरान मलिकला गोलंदाजी करण्याची आणि शक्य तितके सामने खेळण्याची संधी दिली पाहिजे. तो अजूनही युवा आहे. म्हणूनच जास्त विश्रांती देण्याची गरज नाही. तसेच ब्रेट लीने उमरान मलिकला हलका व्यायाम आणि धावण्याचा सल्ला दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"