Andrew Symonds: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अँड्र्यू सायमंड्स ४६ वर्षांचा होता. अँड्र्यू सायमंड्सच्या अपघाताचे वृत्त समजताच अवघ्या क्रिकेट विश्वासह चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. अँड्र्यू सायमंड्स स्वतः कार चालवत होता. अचानक त्याची कार उलटून अपघात झाला.
अँड्र्यू सायमंड्सच्या कारला झालेल्या अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सायमंड्सला तातडीने उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. सायमंड्सला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री टाऊन्सविलेच्या पश्चिमेला ५० किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अपघातावेळी अँड्र्यू सायमंड्स एकटाच गाडीत होता. एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
क्रिकेट विश्वातून तीव्र शोक व्यक्त
ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळलेल्या सायमंड्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. सायमंड्स हा १९९९-२००७ च्या क्रिकेट विश्वावर राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वाचा भाग होता. संघ सहकाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूच्या वृत्तावर माजी यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्टने शोक व्यक्त केला. या वृत्ताने खूप दुःखी झालोय, असे गिलख्रिस्टने ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष लचलान हेंडरसन म्हणाले की, ऑस्ट्रेलियन क्रिकेटने आपला आणखी एक सर्वोत्तम हिरा गमावला आहे. अँड्र्यू अतिशय प्रतिभावान खेळाडू होता. ऑस्ट्रेलियाच्या यशात आणि क्वीन्सलँडच्या समृद्ध क्रिकेट इतिहासाचा एक भाग म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. क्रिकेटसाठी हा आणखी एक दुःखाचा दिवस आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटले आहे.
सायमंड्सच्या निधानाने क्रिकेट विश्वात तसेच इतर स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यामध्ये थायलंडमध्ये सुट्टीवर असताना शेन वॉर्नचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. सायमंड्सची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट शेन वॉर्नला श्रद्धांजली देणारी होती. यानंतर लगेचच काही दिवसांच्या अंतराने अँड्र्यू सायमंड्सने निधन हा ऑस्ट्रेलियासह संपूर्ण क्रिकेट वर्तुळासाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.