aaron finch on jasprit bumrah : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करून जसप्रीत बुमराहने शेजाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. अर्धशतकी खेळीकडे कूच करत असलेल्या मोहम्मद रिझवानचा (४९) त्रिफळा काढून बुमराहने पाकिस्तानला मोठा झटका दिला. त्यापाठोपाठ शादाब खानला देखील भारतीय गोलंदाजाने चीतपट केले. केवळ १९ धावांत २ बळी घेतल्यामुळे बुमराहला 'सामनावीर' पुरस्काराने गौरवण्यात आले. यॉर्कर आणि स्विंगच्या जोरावर भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या बुमराहचे सर्वत्र कौतुक होत असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचने एक मोठे विधान केले आहे.
ESPNcricinfoच्या एका शोमध्ये बोलताना फिंचने जसप्रीत बुमराहचे तोंडभरून कौतुक केले. फिंच म्हणाला की, बुमराहने जेव्हा कारकिर्दीची सुरूवात केली तेव्हा तो खासकरून उजव्या हाताच्या फलंदाजांविरूद्ध इनस्विंग करायचा. त्यानंतर त्याने हळू हळू आउटस्विंग करून फलंदांना सतावण्यास सुरूवात केली. त्यामुळे बुमराहचा सामना करण्यात प्रत्येक फलंदाजाला अडचणी येतात. बुमराहचा सामना करण्यासाठी सर्वात चांगला मार्ग कोणता? असे विचारले असताना फिंचने भन्नाट उत्तर दिले. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराने म्हटले, "यासाठी निवृत्त व्हायला हवे, जे मी केले."
सर्वोत्कृष्ट 'बुमराह'दरम्यान, आताच्या घडीला जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. वेगवेगळ्या शैलीत गोलंदाजी करून फलंदाजांना चीतपट करण्याची क्षमता त्याच्यात आहे. योग्य लाइन आणि लेन्थवर गोलंदाजी करणाऱ्या बुमराने अनेकदा सर्वोत्तम खेळ दाखवला आहे. पाकिस्तानविरूद्ध बुमराहने २.७१ च्या सरासरीनुसार गोलंदाजी करताना सात षटकांत केवळ १९ धावा देऊन २ महत्त्वाचे बळी घेतले.
भारताची विजयी हॅटट्रिक शेजाऱ्यांचा दारूण पराभव करून भारताने चालू विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावली. पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.