Pretty selfish, Tim Paine has slammed Indian Players : ३६ ऑल आऊटनंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कमबॅक करून मालिका जिंकण्याचा पराक्रम अजूनही ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन याला टोचतोय. त्याने भारतीय खेळाडू स्वार्थी असल्याची टीका केली आहे. भारताने २०२०-२१च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऐतिहासिक कामगिरी केली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीच्या त्या दौऱ्या दरम्यान रोहित शर्मा, रिषभ पंत, नवदीप सैनी आणि अन्य भारतीय खेळाडू एका रेस्टॉरंटमध्ये दिसले होते. त्यावेळी कोरोना व्हायरसचा धोका होता आणि या सर्वांनी बायो बबलचे उल्लंधन केल्याचा दावा केला गेला. ऑस्ट्रेलियन मीडियाने हा मुद्दा उचलून धरला. BCCI ने मात्र खेळाडूंनी कोणतेही नियम न मोडल्याचा दावा केला.
या प्रसंगाची आठवण करून देताना त्या मालिकेत ऑसींचे नेतृत्व करणाऱ्या टीम पेनने आता भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. तो म्हणाला, त्या ४-५ खेळाडूंनी संपूर्ण मालिका संकटात आणली होती.. आणि कशासाठी? तर एक वाटी चिप्ससाठी किंवा अन्य कशासाठीही. खरं सांगायचं तर ते स्वार्थी होते.''
पहिल्या कसोटी दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर विराट कोहली पितृत्व रजेसाठी मायदेशात परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका २-१ अशी जिंकून दाखवली. तेव्हा या प्रकरणावरून अजिंक्यने भारतीय खेळाडूंनी कोणताही नियम मोडला नसल्याचे म्हटले होते. ''खेळाडूंचा जो फोटो व्हायरल झाला, त्यात खेळाडू खाद्यपदार्थ पार्सल घेऊन जाण्यासाठी थांबले होते. खराब वातावरणामुळे त्यांना रेस्टॉरंटमध्ये बसावे लागले. पण, जी कथा पसरवली गेली ती चुकीची होती,'' असे रहाणे म्हणाला.