सिडनी - ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू मायकेल स्लेटरला कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली बुधवारी सिडनीमध्ये अटक करण्यात आली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ५१ वर्षीय स्लेटरला गेल्या आठवड्यात घडलेल्या एका घटनेप्रकरणी अटक करण्यात आली आहे. न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सिडनीच्या उत्तर समुद्र किनाऱ्यावर एका ५१ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी कथितरीत्या झालेल्या एका कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पूर्व उपनगर पोलिसांच्या क्षेत्रिय कमांडच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी आज सकाली मेनली येथील एका घरी गेली. तिथून एका ५१ वर्षीय व्यक्तीला अटक केली.
मायकेल स्लेटरने सुमारे १० वर्षे ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००४ मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. त्यानंतर त्याने पूर्णवेळ समालोचक म्हणून काम सुरू केले होते. २१ फेब्रुवारी १९७० रोजी जन्मलेल्या स्लेटरने ७४ कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेल्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात त्याने ४२.८३ च्या सरासरीने ५३१२ झावा जमवल्या होत्या. तर ४२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४.०७ च्या सरासरीने ९८७ धावा जमवल्या होत्या.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येही त्याने जबरदस्त खेळ केला होता. त्याने २१६ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ४०.८५ च्या सरासरीने १४ हजार ९१२ धावा जमवल्या होत्या. तर १३५ लिस्ट ए सामन्यांमध्ये २६.५२च्या सरासरीने ३३९५ धावा जमवल्या होत्या.