भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आगामी आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाला मार्गदर्शन करताना दिसतील. आता त्यांच्या ताफ्यात त्यांच्या सहकाऱ्याची देखील एन्ट्री झाली आहे. टीम इंडियाला ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे द्रविड आता नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते आता आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. याशिवाय त्यांचे जवळचे सहकारी विक्रम राठोड यांच्यावर राजस्थानच्या फ्रँचायझीने फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे द्रविड आणि राठोड हे पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसतील.
राजस्थानच्या फलंदाजांना विक्रम राठोड यांच्या अनुभवाचा फायदा होईल असे अपेक्षित आहेत. त्यांनी टीम इंडियासाठी सात वन डे आणि सहा कसोटी सामने खेळले आहेत. ते २०१९ ते २०२३ पर्यंत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात रिषभ पंत, शुबमन गिल आणि लोकेश राहुल यांसारख्या खेळाडूंना स्टार बनवण्यात हातभार लावला.
द्रविड-राठोड यांची जोडी पुन्हा एकत्रविक्रम राठोड आणि राहुल द्रविड पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. राहुल द्रविड मोठ्या कालावधीपर्यंत राजस्थानच्या संघाचा भाग राहिले आहेत. २०१३ मध्ये ते राजस्थानच्या संघाचे कर्णधार बनले. त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२० फायनल आणि आयपीएलच्या प्लेऑफपर्यंत संघाला नेले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१५ मध्ये त्यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. तेव्हा राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला होता. आताच्या घडीला राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कुमार संगकारा कार्यरत आहे. २०१५ पासून राहुल द्रविड बीसीसीआयशी जोडले गेले, त्यांनी भारताच्या अंडर-१९ आणि भारत अ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. मग एनसीएमध्ये अध्यक्षपदाचा कारभार सांभाळला. अखेर ऑक्टोबर २०२१ पासून त्यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली.