sourav ganguly । नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सलामीवीर पृथ्वी शॉबद्दल एक मोठे विधान केले आहे. पृथ्वी शॉ आता भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच निवड समिती आणि कर्णधाराच्या नजरा नक्कीच पृथ्वी शॉवर असतील, असे माजी भारतीय कर्णधाराने म्हटले आहे.
खरं तर पृथ्वी शॉने भारताकडून शेवटचा सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी त्याचा भारताच्या संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यामुळे आता पृथ्वी थेट आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.
कर्णधार रोहित शर्माची पृथ्वी शॉवर नक्कीच नजर असेल - गांगुलीपृथ्वी शॉ आणि सौरव गांगुली हे दोघेही आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहेत. सौरव गांगुलींचा संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना गांगुली यांनी म्हटले, "माझ्या मते, पृथ्वी शॉ भारताकडून खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्याला संधी मिळणार की नाही हे निवड समितीवर अवलंबून आहे. मला खात्री आहे की रोहित शर्मा आणि निवडकर्ते त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. तो एक चांगला खेळाडू आहे आणि आता पूर्णपणे तयार आहे."
दरम्यान, मागील काही हंगामात पृथ्वी शॉने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना शानदार कामगिरी केली आहे. डावाची सुरुवात करताना त्याने संघासाठी अनेक स्फोटक खेळी खेळल्या. आयपीएल 2021 हा त्याच्यासाठी सर्वोत्तम हंगाम ठरला होता. त्यादरम्यान पृथ्वी शॉने 15 सामन्यात 31.93 च्या सरासरीने 479 धावा केल्या. कर्णधार रिषभ पंतच्या गैरहजेरीत डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची धुरा सांभाळणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"