मुंबई : भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची धुरा आता बिन्नी यांच्या खांद्यावर असणार आहे. खरं तर ते बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष झाले आहेत. रॉजर बिन्नी सौरव गांगुली यांच्या जागी पदभार सांभाळतील. गांगुलींनी 2019 ते 2022 पर्यंत हे पद भूषवले होते. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या नवीन टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दादांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी हे बीसीसीआयला पुढे घेऊन जातील असा विश्वास व्यक्त केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज 91वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात रॉजर बिन्नी यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. सौरव गांगुलीचा तीन वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ संपला. जय शाह हे सचिवपदी कायम राहिले, तर राजीव शुक्ला हे उपाध्यक्षपदी कायम राहिले. आशिष शेलार यांची खजिनदार म्हणून निवड झाली. याशिवाय 2023मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेला भारताला न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी घेण्याचा प्रस्ताव ठेवला गेला. तसेच आजच्या बैठकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला आयपीएल स्पर्धेला मान्यता देण्यात आली आहे.
बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नवीन टीमला शुभेच्छा देताना म्हटले, माझ्या रॉजर बिन्नीला शुभेच्छा. नवीन टीम या सगळ्याला पुढे नेईल. बीसीसीआय चांगल्या लोकांच्या हातात आहे. भारतीय क्रिकेट मजबूत आहे म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो."
बीसीसीआयची नवीन टीम
- अध्यक्ष - रॉजर बिन्नी
- उपाध्यक्ष - राजीव शुक्ला
- सचिव - जय शाह
- सरचिटणीस - देवजित सैकिया
- खजिनदार - आशिष शेलार
रॉजर बिन्नी BCCIचे 36वे अध्यक्ष भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष झाले आहेत. रॉजर बिन्नी हे भारतातील पहिले अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू आहेत. 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ते महत्त्वाचा चेहरा होते. त्या विश्वचषकात त्याचे योगदान खूप महत्त्वाचे होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत प्रथमच विश्वचषकाचा किताब पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे रॉजर बिन्नी या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज ठरले होते. या स्पर्धेत त्यांनी आठ सामन्यांत एकूण 18 बळी घेतले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"