नवी दिल्ली : भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध (IND vs AUS) होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघ जाहीर केला आहे. हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. मराठमोळ्या खेळाडूला मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात स्थान मिळाल्याने क्रिकेट विश्वातील दिग्गज अजिंक्यच कौतुक करत आहेत.
दरम्यान, भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील अजिंक्य रहाणेचे कौतुक केले आहे. "मला तो नेहमीच आवडायचा. टीम इंडियासाठी तो नेहमीच चांगला खेळाडू राहिला आहे. खरं तर संधी रोज येत नाहीत आणि जर त्याला WTC फायनल दरम्यान टीम इंडियाचा भाग बनण्याची संधी मिळाली तर तो त्याचा पुरेपूर फायदा घेईलच. म्हणूनच मी त्याला खूप शुभेच्छा देतो", असे गांगुलींनी रहाणेच्या निवडीवर म्हटले.
रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार संधी?भारताचा यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल आयपीएल पाठोपाठ जागतिक अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम सामन्याला देखील मुकणार आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आगामी महत्त्वाच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल अशी आशा आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून रहाणेने संघात स्थान मिळवले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"